4 लाखांचा टप्पा गाठणारी चांदी अन् EV चं खास कनेक्शन; फिगर्स वाचून तुम्हीही सुरू कराल इन्व्हेस्टमेंट

Silver Price चांदी एकेकाळी सणांमध्ये चमकणाऱ्या नाण्यांसाठी, लग्नात बांगड्या घालण्यासाठी आणि पूजा थाळीवर वाट्या सजवण्यासाठी ओळखली जायची.

4 लाखांचा टप्पा गाठणारी चांदी अन् EV चं कनेक्शन; फिगर्स वाचून तुम्हीही सुरू कराल इन्व्हेस्टमेंट

4 लाखांचा टप्पा गाठणारी चांदी अन् EV चं कनेक्शन; फिगर्स वाचून तुम्हीही सुरू कराल इन्व्हेस्टमेंट

Silver Price & Electric Vehicles : आज सोनियाचा दिन किंवा आजचा दिवस सोनेरी अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे असं आपण सहज बोलून जातो पण, आता चांदीच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे चांदीची चांदी झाली असं म्हणण्याची वेळ आलीये. पण, वाढत्या चांदीच्या किमतींचे रहस्य हे रस्त्यावर धावणाऱ्या EV म्हणजेच इलेक्ट्रिकल व्हेकिकल्समध्ये दडलयं. कसं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर, ही बातमी शेवटपर्यंत वाचा…

अपघातानंतर रस्त्यावर उभं राहून कडाक्याचं भांडणं विसरा; गडकरींनी आणली ‘कात’ टाकणारी टेक्नोलॉजी

चांदी एकेकाळी सणांमध्ये चमकणाऱ्या नाण्यांसाठी, लग्नात बांगड्या घालण्यासाठी आणि पूजा थाळीवर वाट्या सजवण्यासाठी ओळखली जायची. पण आज तीच चांदी भविष्यातील गती बनली आहे. जग पेट्रोल आणि डिझेलच्या पलीकडे जाऊन इलेक्ट्रिक वाहनांकडे वाटचाल करत असताना, चांदीदेखील शांतपणे पण स्थिरमार्गाने पुढे जातीये.

गेल्या 20 महिन्यांतील चांदीच्या एकूण आकडेवारीवर नजर टाकली तर, चांदी 1 लाख रुपयांवरून थेट 4 लाख रुपयांवर पोहोचली आहे. मे 2024 मध्ये एमसीएक्सवर चांदीचा भाव 90 हजार रूपये प्रतिकिलो होता. आज (दि.29) एमसीएक्सवर चांदीचा भाव 21 हजार 276 रुपयांनी वाढून 4 लाख 6 हजार 642 रुपयांवर पोहोचला आहे. जो आजपर्यंतचा सर्वोच्च उच्चांक आहे. गेल्या 27 दिवसांत चांदी तब्बल 1 लाख 42 हजार आठशे रूपये प्रतिकिलोने वाढली आहे. याचाच अर्थ काय तर, गेल्या 27 दिवसांचा हिशोब केला तर, चांदीने थोडा थोडका नव्हे तर, 60 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. अशी तेजी आतापर्यंत ना शेअर बाजारात किंवा सोन्यात कधीच दिसली नाही.

सोने-चांदी गगनाला! तीन लाखांपार गेलेले चांदीमध्ये गुंतवणूक करण्याआधी वाचा तज्ज्ञ काय म्हणाले?

आता ईव्ही आणि चांदीचे भाव यांचा काय संबंध तर, ईव्हीमध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्च-वाहक इलेक्ट्रॉनिक भागांमध्ये आणि बॅटरी सिस्टममध्ये चांदीची वाढती मागणीये. या वाढत्या मागणीमुळे गुंतवणूकदार आणि बाजार दोघांच्याही नजरेत चांदी हा धातू पुन्हा एकदा हूकुमी एक्का ठरतोय आणि त्यामुळेच चांदी केवळ चमकदारपणे चमकत नाही तर, त्याच्या किमतीही वाढत असल्याचे दिसून येतयं.

चांदीच्या किमतीत झालेल्या या ऐतिहासिक वाढीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे औद्योगिक मागणीत झालेली प्रचंड वाढ. पूर्वी चांदीचा एक महत्त्वाचा भाग दागिने आणि नाण्यांमध्ये वापरला जात होता, परंतु आता तो उद्योगात वाढत्या प्रमाणात वापरला जात आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह, चांदीची गरज वाढत आहे. तज्ञांचे मत आहे की, ही मागणी तात्पुरती नाही तर, संरचनात्मक आहे. म्हणजेच, जग तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जेकडे जसजसे वाटचाल करेल तसतसे चांदीची गरजही वाढत राहील.

त्यात जगभरात आता पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं जातयं. आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार, 2030 पर्यंत रस्त्यावर येणाऱ्या तीन नवीन वाहनांपैकी एक वाहन हे इलेक्ट्रिक असू शकते असा अंदाज आहे. ईव्ही वाहनांची रचना ही इतर वाहनांपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. या व्हेईकल्समध्ये इंजिनऐवजी क्लिष्ट अशा इलेक्ट्रॉनिक प्रणाली असतात ज्या पूर्णपणे विजेवर अवलंबून असतात. ज्यात बॅटरी व्यवस्थापन प्रणाली, पॉवर कंट्रोल युनिट, मोटर, सेन्सर्स आणि चार्जिंग सिस्टमचा समावेश असतो. या सर्वामध्ये चांदीचा वापर केला जातो. याशिवाय चांदी सौर ऊर्जा, आधुनिक औषधांच्या केंद्रस्थानी आहे. म्हणूनच आता चांदीला “स्ट्रॅटेजिक मेटल” म्हटले जाते. त्यामुळे कधीकाळी चकाकणाऱ्या सोन्यापेक्षा ईव्ही किंवा इतर उत्पादनांमधील वाढत्या चांदीच्या वापरामुळे चांदीची चांदी झाली असून ती भविष्यातही अशाच पद्धतीने वाढचाल करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version