Why We Forget Dreams : अनेकदा रात्री झोपेत एखादं भन्नाट, भीतीदायक किंवा अगदी आनंददायी स्वप्न पडतं. पण सकाळी उठल्यावर ते पूर्ण आठवतच नाही. कधी स्वप्नातील एखादाच प्रसंग आठवतो, तर काही वेळात तोही विसरून जातो. ‘काल काय स्वप्न पडलं होतं बरं?’ असा प्रश्न अनेकांना पडतो. पण असं नेमकं का होतं? याचं उत्तर आता विज्ञानाने दिलं आहे. वैज्ञानिकांच्या मते, स्वप्न पडणं आणि ती आठवणीत राहणं याचा थेट संबंध आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीशी आणि झोपेच्या टप्प्यांशी आहे.
स्वप्नं नेमकी कधी पडतात?
आपली झोप अनेक टप्प्यांत विभागलेली असते. त्यापैकी REM म्हणजेच रॅपिड आय मुव्हमेंट हा टप्पा स्वप्नांसाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या काळात डोळ्यांची जलद हालचाल सुरू असते, श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके बदलत असतात, तर मेंदू जवळपास जागेपणी जितका सक्रिय असतो तितकाच सक्रिय होतो. मात्र, शरीर पूर्णपणे विश्रांतीच्या अवस्थेत असतं. याच टप्प्यात बहुतेक स्वप्नं पडतात.
स्वप्नं पडतातच का?
या प्रश्नाचं एकच ठाम उत्तर अद्याप सापडलेलं नाही. मात्र, वैज्ञानिकांनी काही महत्त्वाच्या शक्यता मांडल्या आहेत. सर्वात मान्य असलेल्या मतानुसार, झोपेत असताना मेंदू दिवसभरातील माहितीची छाननी करत असतो. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणत्या विसरायच्या आणि कोणत्या आठवणी कायमच्या साठवायच्या, याचं काम मेंदू झोपेत करतो. या प्रक्रियेदरम्यान दिसणारी दृश्यं म्हणजेच स्वप्नं. दुसरं कारण म्हणजे आपल्या भावना. दिवसभरात आलेला ताण, आनंद, भीती किंवा चिंता यावरही स्वप्नांचा परिणाम होतो. त्यामुळे अनेकदा स्वप्नं वास्तवाशी संबंधित किंवा भावनिक स्वरूपाची असतात. काही संशोधकांच्या मते, स्वप्नं म्हणजे मेंदूची एक प्रकारची सराव प्रक्रिया आहे. भविष्यात कठीण किंवा तणावपूर्ण परिस्थिती आली, तर त्याला कसं सामोरं जायचं याचा मेंदू स्वप्नांमधून अप्रत्यक्ष सराव करत असतो.
सकाळी उठल्यावर आपण स्वप्नं का विसरतो?
यामागे मेंदूतील ‘नॉरएपिनेफ्रिन’ नावाचं रसायन कारणीभूत असल्याचं वैज्ञानिक सांगतात. हे रसायन नवीन आठवणी दीर्घकाळ लक्षात ठेवण्यास मदत करतं. मात्र, REM झोपेदरम्यान त्याचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे स्वप्नं मेंदूत कायमस्वरूपी साठवली जात नाहीत आणि जाग आल्यानंतर काही मिनिटांतच ती धूसर होऊ लागतात. पण, वैज्ञानिकांच्या मते, जर एखादी व्यक्ती REM झोपेच्या शेवटी अचानक जागी झाली, तर तिला पडलेलं स्वप्न जास्त स्पष्ट आठवतं. म्हणूनच अनेकदा अलार्म वाजल्यावर उठल्यावर स्वप्न स्पष्ट आठवतं. पण हळूहळू नैसर्गिकरित्या जाग आल्यास तेच स्वप्न काही मिनिटांत विसरलं जातं.
हे सर्व लक्षात घेतलं तर, स्वप्नं ही केवळ कल्पनांची दुनिया नाही, तर आपल्या मेंदूची आठवणी, भावना आणि अनुभव यांची मांडणी करण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रत्येक स्वप्न सकाळपर्यंत लक्षात राहीलच असं नाही. उलट, बहुतेक स्वप्नं विसरणं ही मेंदूची सामान्य आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली कार्यपद्धती आहे. 2019 मध्ये स्वप्नांबाबतचा एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला होता. त्याची लिंक खाली दिली आहे. https://www.nih.gov/news-events/news-releases/brain-may-actively-forget-during-dream-sleep
डिस्क्लेमर : वरील बातमी सामान्य माहितीवर आधारित असून, लेट्सअप मराठी याबाबत कोणताही दावा करत नाही.
