Download App

प्रशासनात भूकंप! पुणे जिल्हाधिकाऱ्यामुळे आत्महत्येची वेळ; प्रांताधिकाऱ्याचा गंभीर आरोप

खेड आळंदीचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे पुण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांबद्दल संशय व्यक्त करत तक्रार केली आहे.

Pune Collector Suhas Diwase : लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा उद्या पार पडतोय. त्यानंतर चार दिवसांतच निकाल लागणार आहेत. मात्र, त्यापूर्वी अनेक खळबळजनक प्रकार समोर येत आहेत. आता पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर त्यांच्याच ‘टीम’मधील प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारेंनी गंभीर आरोप केले आहेत. तसंच, ‘राष्ट्रवादीच्या आमदाराच्या सांगण्यावरून दिवसे आपला मानसिक छळ करत आहेत. त्यांच्या त्रासामुळे माझ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे, असा थेट आरोप करून कट्यारे यांनी प्रशासनात मोठा भूकंप घडवला आहे.

राजकीय संबंधांचा आधार 

कट्यारे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असून लोकसभेची मतमोजणी होण्यापूर्वी त्यांची बदली करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, सुहास दिवसे हे खेड-आळंदीचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त, पीएमआरडीएचे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय हितसंबंधांचा आधार घेतला आहे, असा आरोप कट्यारे यांनी केला आहे.

पुणे अपघात प्रकरणात अंधारेंचा मोठा दावा; म्हणाल्या, डॉ. तावरेंना सहाव्या मजल्याचं संरक्षण

ते मला मानसिक त्रास देतात

सुहास दिवसे यांनी पुणे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर ते मला लक्ष्य करुन त्रास देत आहेत. लोकसभा निवडणूक काळात निवडणूक अधिकारी असलेले दिवसे मला वारंवार अपमानित करतात. खरंतर मी यापूर्वी त्यांच्या हाताखाली प्रत्यक्ष कधीच काम केलेलं नाही. त्यामुळे केवळ विद्यमान लोकप्रतिनिधी त्यांना जे सांगतात तेच खरं असं समजून ते मला मानसिक त्रास देत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी माझ्याकडून पूर्व चक्राकार मार्गाचा खेड तालुक्याचा कार्यभार काढून घेतला आहे असंही कट्यारे यांनी पत्रात म्हटलं आहे.

आमदारांना भेटत होते

सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमीन अधिग्रहण प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केलेली असताना 28 मे रोजी त्यांनी खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा टाकला.‌ सुहास दिवसे यांनी हे सर्व खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केलं आहे, असा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर‌ सुहास दिवसे हे निवडणुकीच्या काळात सतत खेड आळंदीच्या आमदारांना भेटत होते. या आमदारांचा सुहास दिवसे यांना त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासून पाठिंबा राहिला आहे. आगामी विधानसभा निवडणुका स्वतंत्र वातावरणात पार पाडण्यासाठी सुहास दिवसे यांची बदली होणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली.

जुन्या खड्ड्यात नवं रोप; पुणे अपघात प्रकरणातील ‘SIT’च्या अध्यक्षांवरच भ्रष्टाचाराचे खंडीभर आरोप

कोण आहेत जोगेंद्र कट्यारे?

जोगेंद्र कट्यारे हे सध्या खेड-राजगुरूनगर प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. 23 वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 10 वर्षे नायब तहसीलदार, 8 वर्षे तहसीलदार, 5 वर्षे प्रांताधिकारी म्हणून सातारा, सांगली, नागपूर आणि पुणे जिल्ह्यात काम पाहिलं आहे. आता जोगेंद्र कट्यारे यांच्या पत्रानंतर निवडणूक आयोग काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

 

follow us