Pune : पुणे जिंकणाऱ्या मोहोळांवर मोठी जबाबदारी; ‘या’ दोन मतदारसंघात ‘लीड’ मिळवायचंच
Pune News : लोकसभा निवडणुकीत मोठा फटका (Pune News)महायुतीला बसला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Elections) महायुतीकडून रणनीती आखण्यात येत आहे. प्रत्येक मतदारसंघनिहाय जबाबदारी भाजपच्या प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात येत आहे. यामध्ये पुण्यातील कसबा आणि पर्वती या दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्यावर भाजपकडून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघांचीही जबाबदारी देण्यात आली आहे.
जबाबदारी मिळाल्यानंतर मोहोळ यांनी कामाला सुरुवात केली आहे. पहिली बैठक कसबा विधानसभा मतदारसंघात घेतली. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. आगामी निवडणुकीत पक्षाचं धोरण, पदाधिकाऱ्यांची भूमिका, विरोधकांकडून पसरवले जाणारे नरेटिव्ह, केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी आणि विकासकामे, कार्यकर्त्यांची भूमिका या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपाच्या विचारधारेला मानणारा आणि विकासाला मानणारा वर्ग कसब्यात आहे. आगामी निवडणुकीतही हीच परंपरा कायम असेल, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.
कसब्यात झालेल्या बैठकीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पर्वती मतदारसंघात बैठक घेतली. इच्छुकांसह पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पर्वती मतदारसंघातून चांगलं लीड मोहोळ यांना मिळालं होतं. त्यामुळे कसब्याप्रमाणेच पर्वती मतदारसंघ देखील भारतीय जनता पार्टी सहज जिंकेल असा विश्वास, मोहोळ आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसला.
दरम्यान, पहिल्याच टर्ममध्ये खासदार आणि केंद्रामध्ये राज्यमंत्री म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात देखील मोहोळ यांच्या सहाय्याने भाजपला फायदा होईल याची जबाबदारी मोहोळ यांच्यावर आहे. लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सातारा (Satara) वगळता कुठलाच उमेदवार भाजपला निवडून आणता आला नव्हता. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आता या परिस्थितीमध्ये नुकतेच खासदार आणि केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागलेले मोहोळ पुण्यातील पर्वती आणि कसबा या विधानसभा मतदारसंघासह पश्चिम महाराष्ट्रातील इतर विधानसभा मतदारसंघात कशी कामगिरी बजावतात याकडे भाजप श्रेष्ठींचं लक्ष लागलं आहे.
विनोद तावडेंचा पश्चिम महाराष्ट्रात मोठा डाव; शरद पवार गटाच्या नेत्याशी बंद दाराआड खलबत