Download App

सांगलीच्या जागेचा वाद तापला : ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांची घोषणा होताच काँग्रेसचा तीळपापड

सांगली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीची (Lok Sabha) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करुन एकूण १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यादी जाहीर होताच काँग्रेसने (Congress) पाटील यांच्या उमेदवारीच्या घोषणेवर आक्षेप घेतला आहे. (Chandrahar Patil’s candidature has been announced from Sangli Lok Sabha Constituency.)

सांगलीच्या जागेवर तिढा असताना ही उमेदवारी जाहीर केलीच कशी असा सवाल काँग्रेस नेत्यांनी विचारायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, विक्रम सावंत, काँग्रेसचे सांगली मतदारसंघाचे इच्छुक विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्याचवेळी ठाकरेंनी इथून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केल्याने दोन्ही पक्षात तणाव निर्माण झाला आहे.

तिकडे उमेदवारीची घोषणा अन् इकडे ईडीची नोटीस : अमोल कीर्तीकर, दिनेश बोभाटेंना चौकशीसाठी बोलावणे

काँग्रेस आमदार झिशान सिद्दकी यांनी तर थेट ठाकरे गटावर आरोप केले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करणे यावरुन दिसून येते की मित्र पक्ष म्हणून काँग्रेसला ते किती महत्त्व देतात आणि त्यांचा आदर करतात. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या विरोधात बोलल्याबद्दल माझ्यावर टीका होत आहे पण एक दिवस लोकांना कळेल की ही युती महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचेच नुकसान कसे करते, असे सिद्दकींनी म्हटले आहे. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मशाल नाही विशाल अशा कॅम्पेनिंगला सुरुवात केली आहे.

दरम्यान, या सगळ्या वादावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, रामटेक काँग्रेसने जाहीर केल्यावर तुम्ही कशी काय जाहीर केलं असं आम्ही नाही विचारलं तिथे गेल्या चार टर्म आमचा खासदार निवडून येतोय, पण काँग्रेसने ती जागा मागितल्यावर आम्ही दिली. त्या बदल्यात ईशान्य मुंबई आम्ही लढू असं सांगितलं पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला एक जागा हवीच. शिवसेना मोठा पक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसचा नेमका वाद काय?

कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडल्याने सांगली लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा सांगितला होता. मात्र काँग्रेसमध्येही जागा सोडण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये या मतदारसंघावरुन रस्सीखेच सुरु होती. पण ठाकरे यांनी मिरज इथे झालेल्या जाहीर सभेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. आता आज जाहीर झालेल्या अंतिम यादीतही पाटील यांचीच उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे.

follow us