Download App

Lok Sabha Election 2024 : नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात ‘त्रिमूर्तीं’ची दमछाक

लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत असताना महायुतीमधील पक्षांमध्ये कुरबुरी वाढीला लागल्या आहेत. अनेक ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेल्यांना किंवा इच्छुक असलेल्यांना पक्षांतर्गत किंवा मित्रपक्षाकडून विरोध सहन करावा लागत आहे. त्यामुळे नाराजांच्या नाकदुऱ्या काढून बंडखोरी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करताना त्रिमूर्तींची अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची चांगलीच दमछाक होत आहे. (efforts by eknath shinde devendra fadnavis and ajit pawar to reduce the displeasure of the disgruntled)

कुठे कुठे कोण कोण नाराज आहेत… पाहुयात

बारामतीत कुस्तीचा फड :

बारामती या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात महायुतीत वाद रंगला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे. अजित पवारांवर टीका करत शिवतारे यांनी बारामतीमधून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवतारेंना यांची समजूत काढली पण त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. आता शिवतारे यांनी माघार घेतली नाही तर, तर आम्हालाही महायुतीचा धर्म तोडावा लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे. मात्र शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी काल भोरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची भेटही घेतली.

Patanjali Ayurveda : जाहिरातींद्वारे दिशाभूल, ‘पतंजली’ची सुप्रीम कोर्टात बिनशर्त माफी

त्याचवेळी इंदापूरमध्येही भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढने हे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी मोठे आव्हान बनले आहे. आधी विधानसभेचा शब्द द्या, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मात्र इंदापूरमध्ये दत्तामामा भरणे यांच्यारुपाने अजित पवार यांचा हक्काचा बालेकिल्ला तयार झाला आहे. भरणे यांनी दोनवेळा राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजय मिळविला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ पाटील यांच्यासाठी कसा सोडायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. त्याचवेळी पाटील यांनी आपल्याला विरोधी गटाकडून अर्थात राष्ट्रवादीकडून धमक्या येत असल्याचे पत्रही त्यांनी शिंदे आणि फडणवीस यांना लिहिले आहे.

माढ्यात उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही विरोध :

रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची माढ्यातून उमेदवारी घोषित झाल्यापासूनच मोहिते पाटील घराणे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधाला सुरुवात केली आहे. आमचे कार्यकर्ते त्यांचे कामच करणार नाहीत, असा सूर आळवायला दोन्ही नेत्यांनी सुरुवात केली आहे. मोहिते पाटील यांनी तर थेट तुतारीच चिन्ह हाती घ्यावे अशी मागणी कार्यकर्ते करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.

भाजपकडून जरी उभे राहिला तरी तुम्हाला मतदान करणार नाही, असे कार्यकर्ते या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसून येत आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनीही नुकताच फलटणमध्ये भव्य मेळावा घेतला. यात आक्रमक भाषण करत कार्यकर्त्यांना चेतवण्याचे काम केले. याच सगळ्या घटनाक्रमामुळे माढ्यात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची घोषित केलेली उमेदवारी बदलण्याची भाजपवर नामुष्की येणार अशी चर्चा सुरु आहे.

अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना विरोध

अमरावतीमध्ये कमळ चिन्हावर महायुतीचा उमेदवार असेल, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. अशात विद्यामान खासदार नवनीत राणा गेली पाच वर्षे भाजपबरोबर असल्यामुळे त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो असे सूतोवाचही त्यांनी केला. मात्र स्थानिक भाजप नेत्यांचा राणा यांना विरोध आहे. राणा यांना उमेदवारी द्यायची असेल, तर भाजप नेतृत्वाला नाराजांची समजूत काढावी लागेल. याशिवाय शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनीही या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यामुळे राणा यांना कमळावर उमेदवारी कशी मिळणार? असा सवाल विचारला जात आहे.

राष्ट्रवादीत पुन्हा उलटा प्रवास :

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये उलटा प्रवास सुरू झाल्याचे दिसून येत आहे. बीडमधून 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढलेल्या बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेलला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. त्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनीही अजित पवारांची साथ सोडली होती. लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील यांच्याविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

भिवंडीत वादाचा ‘हत्ती’ :

भिवंडी मतदारसंघात भाजपने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली असली तरी त्यांना मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा छुपा विरोध आहे. कथोरे व त्यांच्या समर्थकांनी प्रचारसभेकडे पाठ फिरवल्यानंतर पाटील यांनी नाव न घेता त्यांचा ‘हत्ती’ असा जाहीर उल्लेख केला.

गावित यांना भाजपमधूनच विरोध :

विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी गतवेळी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. यंदा त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपने अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. तरी गावित यांना पक्षातूनच विरोध आहे. भाजप जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे गावित यांची तक्रार केली आहे.

मनसेला भाजपच्या उत्तर भारतीय पदाधिकारी अन् रामदास आठवलेंचा विरोध :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर मनसेचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे. याबाबत दोन दिवसांत घोषणा होण्याची शक्यता आहे. याला फडणवीस यांनीही दुजोरा दिला. तरी मनसेला भाजपमधून तसेच महायुतीतून विरोध सुरू झाला आहे. भाजपमधील उत्तर भारतीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते विशेष करून नाराज आहेत. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही राज ठाकरेंना घेऊन रालोआचा काहीही फायदा होणार नाही, असे वक्तव्य केले आहे.

जागावाटपाचा तिढा सुटणार? ‘मविआ’ची आज मेगा बैठक; मनसेही करणार प्लॅनिंग

यवतमाळ-वाशिममध्ये संजय राठोड इच्छुक :

यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून भावना गवळी यांच्याविरोधात नाराजीचा सूर असल्याचा दावा करत संजय राठोड यांनी इथून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचवेळी भावना गवळी यांनी मात्र आपणच उमेदवार असल्याचे म्हटले आहे.

शिवसेनेच्या अनेक मतदारसंघावर भाजप आणि राष्ट्रवादीचा दावा :

याशिवाय नाशिक, हिंगोली, कोल्हापूर, परभणी, उस्मनाबाद, औरंगाबाद, सातारा, रामटेक, दक्षिण मुंबई अशा विविध शिवसेनेच्या विद्यमान मतदारसंघावर भाजप आणि शिवसेनेने दावा केला आहे. त्यामुळेच महायुतीत पक्षांतर्गत नाराज आणि बंडखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यावर आता हे तीन पक्ष कशी मात करतात आणि हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us