भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याची कथित ‘सीडी’ आपल्याकडे आहे, असा दावा करुन एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) कधीकाळी खळबळ उडवून दिली होती. त्या ‘सीडी’ची शिडी करून खडसे चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये (NCP) आले. या काळात त्यांनी स्वतःसाठी आमदारकी आणि कन्या रोहिणीसाठी महिला प्रदेशाध्यक्षपद मिळवले. पण ना ती कधी सीडी बाहेर आली, ना कधी खडसे त्याबाबत बोलले. आता खडसे पुन्हा भाजपमध्ये (BJP) जात आहेत. त्यांच्या घरवापसीसाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजन यांचा विरोध होता. पण विनोद तावडे यांनी पुढाकार घेतला, जळगाव आणि आजूबाजूची परिस्थिती पाहून त्यांनी बाजू लावून धरली अन् खडसेंना ग्रीन सिग्नल मिळाला. यातून पक्षाने ‘कॅलक्युलेटेड रिस्क’ घेतल्याचे दिसून येत आहे… हीच रिस्क नेमकी काय आहे, ते आपण या व्हिडीओमधून पाहणार आहोत.
फडणवीस व महाजनांशी टोकाचे मतभेद असताना, महाजन आणि खडसेंमधून विस्तवही जात नसताना भाजपत येण्यासाठी मन का बनवले ? हा जसा प्रश्न आहे, तसाच भाजपनेही त्यांना कसे स्वीकारले? हाही कळीचा मुद्दा आहे. या दोन्ही प्रश्नांमागे कमी अधिक प्रमाणात ‘सध्याच्या स्थितीशी तडजोड’ हा एक समान धागा आहे.
खडसेंना ग्रीन सिग्नल मिळण्याचे पहिले कारण म्हणजे रक्षा खडसेंची खासदारकी :
भाजपला महाराष्ट्रातील अनेक जागा स्वबळावर किंवा फक्त मोदींच्या प्रतिमा आणि लोकप्रियतेवर जिंकण्याचा आत्मविश्वास नाही, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती स्वीकारुनच भाजपने एकनाथ शिंदे अन् अजित पवार यांना सोबत घेत तडजोडी केल्या. अशीच तडजोड भाजपने खडसेंच्या रुपाने खान्देशात केली आहे. खडसे यांचा पूर्वीप्रमाणे प्रभाव राज्यभर नसला तरी खान्देशात आजही त्यांना मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. अशात रावेरची जागा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाला सुटली आहे. त्यामुळे तिथे रक्षा खडसे यांच्या मतांना फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊनच एकनाथ खडसेंसाठी भाजपचे दरवाजे उघडण्यात आल्याचे बोलले जाते.
ओबीसी मतांची मोट :
भाजपमध्ये पूर्वी गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे आणि पांडुरंग फुंडकर हे ओबीसींचे प्रमुख नेते होते. आज गोपीनाथ मुंडे आणि पांडुरंग फुंडकर हयात नाहीत. पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा पुढे चालवत आहेत. मात्र भाजपला खान्देशात एका बड्या ओबीसी नेत्याची कमतरता कमालाची जाणवत होती. अशात ज्यांनी पक्षात हयात घालवली, अशा ओबीसी नेत्याला पुन्हा घेऊन ओबीसी मतांची मोट बांधण्याचा पक्षाचा प्रयत्न दिसतो. पक्षापासून दुरावलेले स्वकीय व मित्रपक्षांना सोबत घेण्यासाठी भाजपने ज्यांच्याकडे जबाबदारी दिली, त्या विनोद तावडेंच्या मध्यस्थीमुळेही हे शक्य झाल्याचे दिसून येते.
फडणवीसांनाही ‘मेसेज’ :
मगाशी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध केला असणार, हे सर्वश्रुत आहे. मात्र तरीही भाजपने खडसेंना ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे फडणवीस यांनी 2019 मध्ये बावनकुळे, खडसे, तावडे अशी ज्यांची ज्यांची तिकीट कापली त्या जवळपास सगळ्यांचे आता पुनर्वसन झाल्याचे दिसून येत आहे. यातून फडणवीस गटाने ‘हवेत राहू नये, केंद्रीय पातळीवर काही निर्णय फडणवीसांच्या विरोधातही घेतले जाऊ शकतात, असा मेसेज त्यातून पोचविण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील गौणखनिज प्रकरणी खडसे आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना 137 कोटींचा दंड करण्यात आला होता. तो सरकारने रद्द केला आहे. याशिवाय पक्षप्रवेशाच्या बदल्यात खडसेंना भाजपकडून काही शब्द मिळाल्याचे सांगण्यात येते. भोसरी भूखंड घोटाळ्यात क्लीन चिट आणि अन्य चौकशीच्या ससेमिऱ्यातून सुटका, असे शब्द त्यांना देण्यात आले आहेत, अशी चर्चा आहे. खडसे यांना वयामुळे संघर्ष करण्यासाठी मर्यादा आहेत. त्यामुळे त्यांना भविष्यात राज्यपाल पदी संधी दिली जाईल, असेही कळते. तेलंगणाचे राज्यपाल पदही नुकतेच रिक्त झाले आहे. याशिवाय त्यांची कन्या रोहिणी यांचेही राजकीय पुनर्वसन केले जाईल. भविष्यात रोहिणी यांना विधानसभेत संधी दिली जाऊ शकते, असाही शब्द खडसेंना देण्यात आल्याचे बोलले जाते.