गुढी पाडव्याचा मुहुर्तावर MVA करणार उमेदवारांची घोषणा, सांगली नेमकी कुणाकडे जाणार?
Maha Vikas Aghadi Seat Shearing : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) प्रत्येक मतदारसंघात जोर लावण्यात येत आहे. यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडून 48 मतदारसंघाात कोणता पक्ष कोणत्या जागेवर निवडणूक लढवणार हे निश्चित झालं असून, उद्या (दि.9) सकाळी 11 वाजता मविआची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सांगलीसह अनेक जागांवर कोणत्या पक्षाचा उमेदवार मैदानात उतरणार याच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांगलीत कोणाला मिळणार संधी?
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात काही जागांवरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्ष सांगली मतदारसंघासाठी दावा करत आहे. या जागेवर ठाकरे गटाकडून उमेदवार देखील जाहीर करण्यात आला आहे. ठाकरे गटाने सांगली मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद आणखी वाढला आहे.
काँग्रेसकडून या जागेसाठी विशाल पाटील (Vishal Patil) इच्छुक असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून या जागेवर मैत्रीपूर्ण लढत करण्याची मागणी होत आहे. यामुळे उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगली मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील की विशाल पाटील कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागणार आहे.
सांगलीसाठीविशाल पाटील शड्डू ठोकून मैदानात
सांगली लोकसभा मतदारसंघातून लढण्याबाबत आम्ही ठाम आहोत. याबाबत कदाचित गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा होऊ शकते. एवढे दिवस थांबला आहात. उद्यापर्यंत वाट बघा. पण सांगलीमधून काँग्रेसच (Congress) लढणार असे म्हणत इच्छुक उमेदवार आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ठणकावले. सांगलीतील काँग्रेस नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद आज (8 एप्रिल) पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.