सुनेत्रा पवार यांच्याकडे दुहेरी जबाबदारी; फडणवीसांनी वित्त खाते स्वतःकडे का ठेवले? पडद्यामागची चर्चा उघड

वित्तखाते वगळता उपमुख्यमंत्रिपदासह उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि औकाफ ही खाती आता सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design 38

Sunetra Pawar has a dual responsibility : अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असताना, सत्तासमीकरणांमध्येही वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यांच्या अखत्यारीत असलेली महत्त्वाची खाती नव्याने वाटप करण्यात आली असून, या प्रक्रियेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्याकडे असलेले वित्तखाते वगळता उपमुख्यमंत्रिपदासह उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि औकाफ ही खाती आता सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.

त्यामुळे सत्तेच्या केंद्रस्थानी सुनेत्रा पवार यांची भूमिका अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, सर्वात महत्त्वाचे आणि प्रभावी मानले जाणारे वित्तखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या. विशेषतः वित्तखाते भाजपने राष्ट्रवादीकडून काढून घेतल्याची चर्चा जोर धरू लागली होती. मात्र, राष्ट्रवादीतील वरिष्ठ सूत्रांनी या चर्चांना पूर्णविराम देत स्पष्ट केले की हा निर्णय तात्पुरता असून, येत्या तीन ते चार महिन्यांत वित्तखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे सोपवले जाणार आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या आर्थिक घडामोडींमध्ये सातत्य राहावे आणि काही महत्त्वाचे प्रलंबित निर्णय पूर्ण व्हावेत, यासाठीच मुख्यमंत्र्यांनी हे खाते स्वतःकडे ठेवले, अशी माहिती समोर येत आहे. अजित पवार यांची राज्याच्या वित्तविभागावर मजबूत पकड होती. त्यांनी तब्बल अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करून राज्याच्या आर्थिक धोरणांना दिशा दिली होती. त्यांच्या कार्यकाळात महसूल वाढ, पायाभूत सुविधांसाठी निधी, तसेच जिल्हानिहाय विकास आराखडे यावर विशेष भर देण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर वित्तविभाग कोणाकडे जाणार, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता.

शिक्षण क्षेत्र हादरलं; वेतन अनुदानात सव्वा कोटींचा घोटाळा; माजी अध्यक्षांसह शिक्षकांवर गुन्हा दाखल

सूत्रांच्या माहितीनुसार, वित्तखाते मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतरच घेण्यात आला. या बैठकीत पुढील राजकीय धोरण, सत्तासंतुलन आणि आगामी निवडणुकांची रणनीती यावरही चर्चा झाली. वित्तखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे देण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले जाते. या चर्चेदरम्यान पार्थ पवार आणि जय पवारही उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ प्रशासनिक नसून राजकीय समन्वयातून घेतला जात असल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान, पक्षांतर्गत पातळीवरही मोठा निर्णय घेतला जाणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुढील पंधरवड्यात बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी यास संमती दर्शवली असून, कोणत्याही प्रकारचा विरोध नसल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्रिपदासोबतच पक्षाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर येणार असल्याने, पक्षातील नेतृत्व अधिक केंद्रीकृत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण आकार घेत आहे. वित्तखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची पुढील वाटचाल कशी असेल, याविषयीही राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी काही महिने राज्याच्या सत्ताकारणासाठी निर्णायक ठरणार, हे मात्र निश्चित.

follow us