“लीड कमी राहील. पण विजयाची नक्की खात्री आहे”
“महायुतीमध्ये राहून अनेक ठिकाणी आपल्या विरोधात काहीजणांनी काम केले.”
“सहानुभूतीच्या जोरावर निवडणूक खेळता येते. पण फक्त सहानभूतीवर लोक मतदान करत नाहीत.”
सांगलीचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांची गत आठवड्यातील ही तीन विधानं चांगलीच चर्चिली गेली. नुकतचं एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही विधानं केली होती. तसं सांगलीतील मतदान होऊन आता तीन आठवडे झालेत. निकालाला अवघा आठवडा बाकी आहे. असं असताना अचानक त्यांनी ही पत्रकार परिषद का घेतली याचं कोडं अनेकांना सुटलं नाही.
तर या पत्रकार परिषदेचं निमित्त होतं निमित्त होतं विश्वजित कदम यांचं एक विधानाचे. “मी कुठल्या पाटलांच्या मागे उभा आहे हे 4 जूनला कळेल” हे ते विधान होते. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं होतं. त्यावर पानिपतकार विश्वास पाटील यांनीही ‘तुमची दृष्टी विशाल आहे’ असे म्हणत कदम यांच्या वक्तव्याला दाद दिली. सांगलीत या विधानाची बरीच चर्चा झाली. रील व्हायरल झाले. विशाल पाटील यांच्याबाजूने वातावरण तयार होऊ लागले. यावरुन संजयकाकांची चांगलीच सटकली. त्यांचा अक्षरशः तीळपापड झाला.थोडक्यात संजयकाका फुल टेन्शनमध्ये आले.
याच टेन्शनमध्ये बोलताना त्यांनी तीन गोष्टी मान्य केल्या. पहिली, लीड कमी राहणार. 2014 ची लोकसभा दोन लाख 40 हजारांच्या फरकाने, 2019 ची लोकसभा एक लाख 64 हजारांच्या मताने जिंकलेल्या संजय काकांनी यंदा लीड कमी राहिल असे मान्य केलं. हे मान्य करताना त्यांची वाढलेली धाकधूक चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती. 2019 मध्ये संजयकाकांच्या मदतीला पडळकर धावून आले होते. यंदा मात्र संजयकाका आणि विशाल पाटील यांच्यातच थेट लढत पाहायला मिळाली. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी नावापुरतीच ठरली.चंद्रहार पाटील यांनी कुस्तीचे मैदान गाजवले असले तरीही ते राजकीय मैदानात फाईट देऊ शकणार नाहीत, असे अनेक नेत्यांचे म्हणणे होते. ते अनेक अर्थांनी खरे ठरले.
संजयकाकांनी दुसरी गोष्ट मान्य केली ती महायुतीमध्ये अनेकांनी विरोधात काम केल्याचे. महायुतीमध्ये राहुनही अनेकांनी विरोधात काम केल्याचं मतदारसंघात दिसून येतं होतं. हे काम काहींनी उघड तर काहींनी छुप्या पद्धतीनं केलं होतं. हीच गोष्ट संजयकाकांनी मान्य केली. माजी मंत्री अजित घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप यांनी उघडपणे विशाल पाटील यांना मदत केली. तर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी छुप्या पद्धतीने संजयकाका पाटील यांच्या विरोधात काम केल्याची चर्चा उपस्थित पत्रकारांमध्ये होती. आता ज्यांच्या बळावर संजयकाका दोनवेळा खासदार झाले तेच नेते त्यांच्याविरोधात गेले आहेत, हे संजयकाकांची धाकधूक वाढण्याचे दुसरे कारण ठरले आहे.
संजयकाकांनी तिसरी गोष्ट मान्य केली ती सहानुभूतीची. मतदानापूर्वी जे संजयकाका विशाल पाटील यांना सहानुभूती नाहीच असे म्हणत होते, तेच संजयकाका आता सहानुभूतीच्या जोरावर निवडणूक खेळता येते, असे म्हणत आहेत. त्यामुळे विशाल पाटील यांना सहानुभूती होते हे त्यांनीच मान्य केले आहे. याच सहानुभूतीच्या आधारे विशाल पाटील यांना काँग्रेसच्या मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याचा अंदाज आहे. याशिवाय संजयकाकांविरोधात 10 वर्षांची कथित नाराजी हाही विशाल पाटील यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरल्याचे बोलले जाते.
विशाल पाटील यांचा विजय का होऊ शकतो? याला आणखीही काही बाजू आहेत. यात एकवटलेली आघाडी हे प्रमुख कारण सांगावे लागले. मगाशी सांगितल्याप्रमाणे विलासराव जगताप, अजितराव घोरपडे यांची उघड, तर पृथ्वीराज देशमुख यांची छुपी मदत विशाल पाटलांना झाली. याशिवाय वसंतदादा घराण्याचा, काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाल्याने सांगलीतील मदन पाटील गट, विशाल पाटील, प्रतिक पाटील, विश्वजीत कदम हे सगळे गटतट एकत्र आल्याचं दिसून आलं.
काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी आघाडी धर्म बाजूला ठेवून विशाल पाटील यांना साथ दिल्याचे दिसून आले. सांगलीत पृथ्वीराज पाटील यांनीही विशाल यांनाच साथ दिल्याचे बोलले जाते. तासगांवात रोहित पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांनीही ‘संजयकाका नकोतच’ या भूमिकेतून विशाल पाटील यांना मदत केल्याची चर्चा आहे. जत तालुक्यातील धनगर नेत्यांनीही विशाल पाटलांना पाठिंबा दिला होता. त्यांना या धनगर मतांचा मोठा फायदा होऊ शकतो. यासोबतच सरपंचांपासून ते नगरसेवकांपर्यंत सर्वांनीच विशाल पाटलांनाच पसंत दिली असल्याचं चित्र दिसून येत आहे.
सांगली-मिरज भागातील हिंदू मतांसाठी संजयकाका पाटील यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन केलं होतं. पण याच सांगली-मिरज भागात मुस्लिम मतदानही मोठ्या संख्येने आहे. याशिवाय जिल्ह्यात दलित मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. ही मते यंदा विशाल पाटलांनी आपल्याकडे ओढली असल्याचे सांगितले जाते. मात्र विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यामध्ये या मतांचे ध्रुवीकरण झाले असल्यास त्याचा फायदा संजयकाकांना होऊ शकतो असा अंदाज आहे. थोडक्यात संजयकाकांना आलेला कमी लीडचा अंदाज, विरोधात गेलेले मित्र, सहानुभूती, एकवटलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिलेली साथ यामुळे विशाल पाटील यांना विजयाची संधी आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.