उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून एक तरुण रोजगारासाठी महाराष्ट्रात येतो… रस्त्यावर कांदे-बटाटे विकू लागतो… एक दिवस इंदिरा गांधी यांच्या संपर्कात येतो… काँग्रेससाठी काम करू लागले. उत्तर भारतीयांचा आवाज बनतो… एक एक पायरी चढत पक्षात मोठ्या पदांवर जातो… आमदार होतो… मंत्री होतो… पण हाच तरुण जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये जातो तेव्हा मात्र गंडतो… एवढा गंडतो की तब्बल एक लाखांच्या मतांनी पडतो.
महाराष्ट्राचे माजी मंत्री राहिलेल्या कृपाशंकरसिंह यांची ही गोष्ट. (Kripashankar Singh, who was successful in Maharashtra politics, failed in his own Jaunpur constituency.)
काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या कृपाशंकरसिंह यांना पक्षाने जौनपूर लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरवले होते. पण समाजवादी पक्षाच्या बाबू सिंह कुशवाह यांनी कृपाशंकर सिंग यांचा 99 हजार 335 मतांनी पराभव केला. बाबू सिंह कुशवाह यांना 5,09,130 मते मिळाली तर कृपाशंकर सिंग यांना 4,09,795 मते मिळाली. थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या राजकारणात यशस्वी झालेले कृपाशंकर सिंह स्वतःच्या घराच्या मतदारसंघात सपशेल गंडले.
कृपाशंकर सिंह हे मूळचे उत्तर प्रदेशमधील जौनपूरचे. त्यांचे वडिल स्वातंत्र्यसैनिक होते. 1970 च्या दशकात कृपाशंकर सिंह रोजगारासाठी मुंबईत आले. सुरुवातीला रस्त्यावर कांदे-बटाटे विकून उपजीविका केली. नंतर इतर छोटे-मोठे उद्योग केले. एकदा मुंबईतील एका कार्यक्रमात ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर ते काँग्रेससाठी काम करू लागले. उत्तर भारतीयांचा आवाज म्हणून त्यांना ओळखले जावू लागले. पक्षाने त्यांच्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. ते काँग्रेसचे राज्य सचिव होते. नव्वदच्या दशकात ते विधानपरिषदेवर गेले. आमदार झाले. 1999 मध्ये विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. विलासराव देशमुखांच्या सरकारमध्ये मंत्रीही झाले. पुढे 2009 मध्ये कलिना विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवरही निवडून आले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले. इथपर्यंत त्यांचा आलेख चढता होता.
पण 2014 पासून ते गंडत गेले. 2014 च्या निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. कृपाशंकर सिंह यांच्याकडे एकूण साडेतीन कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. परंतु त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कारवाई झाली. त्यांच्याकडे 320 कोटी रुपयांची संपत्ती आढळून आली आहे. बारा ठिकाणी जमीन, प्लॅट आणि जंगम मालमत्ता असल्याचे समोर आले. पत्नी, मुलगी व इतर नातेवाइकांच्या नावावर बेनामी संपत्ती आढळून आली. मुंबईतील निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात ईडी, सीबीआय या यंत्रणांकडून सात वर्ष त्यांची चौकशी झाली.
मधल्या काळात त्यांनी काँग्रेसला राम-राम केला. 2021 मध्ये भाजपवासी झाले. पक्ष संघटनेत त्यांना पदही देण्यात आले होते. परत जौनपूर गाठले. मतदारसंघात संपर्क वाढवला. काम सुरु केले. यंदा भाजपने त्यांना जौनपूर लोकसभा मतदारसंघातूनच तिकीट दिले. उत्तर प्रदेशबरोबर मुंबईतील उत्तर भारतीयांच्या मतांचा त्यांना फायदा होईल असे आडाखे बांधण्यात आले. पण कृपाशंकरसिंह यांचं गंडणं काही थांबलं नाही. समाजवादीच्या बाबू सिंह कुशवाह यांनी मोठ्या मताधिक्याने कृपाशंकर सिंग यांचा पराभव केला. कृपाशंकर सिंह यांच्यासोबतच उत्तर प्रदेशमध्ये भाजपही गंडली. युपीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीने 80 पैकी 43 जागा जिंकल्या. तर एनडीएला केवळ 36 जागांवर समाधान मानावे लागले.