Download App

शिर्डी लोकसभेची लढाई धनशक्ती विरुध्द जनशक्ती; उत्कर्षा रूपवतेंचा आजी-माजींवर हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघातील निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी हातात घेतली आहे‌. ‌मतदारसंघातील सामान्य मतदार हीच माझी शक्ती आहे. ‌‌ या मतदारांच्या विश्वासावरच आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत, ही लढाई धनशक्ती विरुध्द जनशक्ती अशी आहे, अशी टीका शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यांनी केली.

कॉंग्रेसने माझा गांभीर्याने विचार केला नाही
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली.‌ त्या पुढे म्हणाल्या, तीन पिढ्यापासून आम्ही काँग्रेससोबत होतो. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपण काँग्रेस पक्षाकडून इच्छुक होतो. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपल्या उमेदवारीबाबत गांभीर्याने विचार केला नाही. या मतदार संघात माझ्यासाठी शेवटची संधी होती. त्यामुळे आपण बहुजन वंचित आघाडी कडून निवडणूक लढविण्याचे पाऊल उचलले.

आमदार बाळासाहेब थोरात हे जेष्ठ नेते आहेत. माझ्यासाठी ते आदरणीय आहेत. काहीही झाले तरी मी अहमदनगर जिल्ह्याची मुलगी आहे. जिल्ह्यातील मी सगळ्या नेत्यांना भेटून माझी भूमिका मांडणार आहे. त्यांना मला मदत करणे शक्य आहे, त्यामुळे मी माझी भूमिका मांडणार आहे, असं उत्कर्षा रुपवते म्हणाल्या.

शिर्डीसाठी कॉंग्रेसचा रेटा कमी
दोन्ही आजी-माजी खासदारांनी काय काम केले आहे, हे जनतेसमोर आहे. एक नवीन उमदा महिला चेहरा नक्कीच लोकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास मला आहे. काँग्रेसमध्ये आमच्या तीन पिढ्या गेल्यात. महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत नक्कीच काही चुका झाल्यात. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसने आपल्या वाट्याला घ्यायला पाहिजे होती. पण कॉंग्रेसचा रेटा कमी पडला, असं मला वाटते.

रुपवते म्हणाल्या, महिलाच्या सबलीकरणासाठी आणि त्यांच्या उद्योजकतेला वाव देण्यासाठी मी काम करणार आहे. सोबतच युवक, शेतकरी, मतदारसंघातील अन्य प्रश्नांसाठी पुढील काळात काम करणार आहे. दोन्ही आजी-माजी खासदारांनी काय काम केले हे जनतेने पाहिले आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी माझ्यावर टीका करताना विचार करावा. स्वतः 10 वर्षे किती पक्ष फिरून आलेत, हे बघावे. वंचित भाजपची बी टीम आहे हे आरोप धांदल खोटे आहेत. ते कोणत्या टीमचे आहेत नक्की हे आत्मपरीक्षण त्यांनी करावे, असा खोचक टीका रुपवतेंनी केली.

निवडणुकीत चिन्हाबद्दल चिंता नाही. एक सक्षम पर्याय म्हणून लोक निश्चितच मागे उभे राहतील. माझ्या मागे कोणतीही अदृश्य शक्ती नाही. फक्त जनतेची ताकद सोबत आहे. त्याच पाठबळावर मला लढायचे आहे. दोन्ही निष्क्रिय आजी-माजी खासदारांचा इतिहास बघता माझ्या हितचिंतकांनी “ना आजी, ना माजी, उत्कर्षाताई मारणार बाजी” ही टॅग लाईन तयार केली आहे. नवीन पक्षात प्रवेश केल्यानंतरचे लोकांचे प्रेम बघता जनता जनार्दन नक्कीच मला साथ देईल, असा विश्वासही रुपवतेंनी व्यक्त केला.

follow us