Download App

सायलेंट व्होटर्सच्या काळजाला हात… मंगळसूत्र अन् संपत्तीवर बोलून मोदींनी निवडणूक फिरवली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कधीही वादात अडकणार वक्तव्य केलं असं ऐकीवात नाही. त्यांचा प्रत्येक शब्द अगदी तोलुनमापून असतो. त्यामागं विचार असतो आणि लक्ष्यही निर्धारित असतं. त्यामुळे जो संदेश त्यांना द्यायचा आहे, तो थेटच जातो. मोदींनी दोन दिवसांपूर्वी केलेलं संपत्ती आणि मंगळसुत्राबद्दलच वक्तव्यही असंच अगदी विचारपूर्वक केलं आहे. त्यांनी थेट भारतातील महिला मतदारांच्या काळजाला हात घातला आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वीच निवडणूक फिरवल्याची चर्चा आहे. पाहुया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य नेमकं का केलं? आणि त्यातून त्यांनी कसा परिणाम साधलाय?

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी प्रचारात एका नवीन मुद्द्याची एन्ट्री झाली. राम मंदीर (Ram Mandir), कलम 370, तिहेरी तलाक, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यासोबत संपत्ती हा मुद्दाही भाजपने (BJP) प्रचारात आणला. काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा मांडल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. या जाहीरनाम्यात संपत्तीच्या न्याय वाटपाचा उल्लेख होता. पण भाजपने हा मुद्दा थेट लोकांचा कष्टाने कमावलेला पैसा हिसकावून इतरांमध्ये वाटणार असल्याच्या वळणावर नेला. तुमच्या घरी किती पैसा आहे, किती सोनं आहे, किती चांदी आहे या गोष्टी काँग्रेस शोधून काढेल. ही संपत्ती वाटली जाईल. अगदी महिलांचं मंगळसूत्रही हिसकावलं जाईलं, अशी भीती मोदींनी व्यक्त केली. याशिवाय माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या जुन्या एका भाषणाचा आधार घेत या कमाईवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे, ही कमाई ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना वाटली जाईल, घुसखोरांना दिली जाईल, असाही दावा मोदींनी केला.

Explainer : निवडणुकांच्या रणधुमाळीत चर्चा पित्रोदांच्या ‘वारसा कराची’; नेमका कर काय?

यावर काँग्रेसने स्पष्टीकरण देत जाहीरनाम्यात असा कुठेही उल्लेख नसल्याचं म्हंटलं. तसंच मनमोहनसिंहांच्या भाषणात एसी, एसटी आणि ओबीसी अशा समाजाचाही उल्लेख असल्याचं निदर्शनास आणून दिलं. निवडणूक आयोगाकडे मोदींच्या हेट स्पीचची तक्रार केली. पण तोपर्यंत मोदींना जो परिणाम हवा होता त्यांना मिळाला होता. अशात बुधवारी सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील वारसा कराचा उल्लेख करुन भाजपला फुल टॉसच दिला. त्यावरही वाद सुरु झाला. मोदी-शाहंसह सगळ्यांची पित्रोदांच्या मतावर तोंडसुख घेतलं. पण मोदींनी या वातावरणात भारतातील एका मोठ्या व्होट बँकेला, सायलेंट व्होटरला टार्गेट करुन त्यांच्या काळजालाच हात घातल्याचं दिसून येत आहे. प्रश्न फक्त आता कसं हा उरतो…

यावर्षी भारतात सुमारे 47 कोटी 15 लाख महिला मतदार आहेत. यापैकी किमान 40 टक्के महिला सायलेंट व्होटर समजल्या जातात. त्यांच्या मतदानाचा, मताचा अंदाज येत नाही. त्या राजकीय प्रक्रियेतही फारश्या सहभागी नसतात. घरात, समाजात, व्हॉट्सअॅपवर किंवा इतर सोशल मीडियावर जी चर्चा चालू असेल त्याSet featured imageआधारे त्या आपले मतदान ठरवत असतात. त्यात सोनं म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. गृहिणी असणाऱ्या स्त्रिया नवऱ्याने घरखर्चाला दिलेले पैसे वाचवून, बचत गट, सोसयटी, बँका अशात साठवून गुंज, गुंज सोनं खरेदी करतात. जोडधंदा, व्यवसाय करणाऱ्या स्त्रियाही गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करतात. शहरात राहणाऱ्या स्त्रिया नोकरीतील पगारातून पैसे साठवून भविष्यासाठी सोनं घेऊन ठेवतात.

लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही; थेट ऑडिओ क्लिप ऐकवत पवारांचा मोदींवर हल्ला

जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार भारतातील महिलांकडे सुमारे 21 हजार टन सोनं आहे. त्याची किंमत मोजली तर हा आकडा 100 लाख कोटींच्या आसपास येतो. हे आकडे जगातील इतर देशांपेक्षा कितीतरी अधिक आहेत. जगातील पहिल्या पाच बँकांकडे सोन्याचा साठा असेल त्यापेक्षा जास्त सोनं भारतीय महिलांकडे आहे. हे बहुतांश सोनं दागिणे स्वरुपात आहे. आता महत कष्टानं साठवलेले पैसे आणि त्यातून खरेदी केलेलं सोनं हे दुसऱ्या कोणाची तरी धन होईल हे कोणत्या महिलेच्या पचनी पडेल? त्यातही मंगळसूत्र म्हणजे महिलांसाठी स्त्रीधनच. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे तुमचं सोनं संभाळायचं असेल तर भाजपला मत द्या, असा संदेश दिल्याची चर्चा आहे.

याशिवाय भारतात पद्मनाभ स्वामी मंदिर, तिरुपती मंदिर, शिर्डी, सिद्धीविनायक, लालबागचा राजा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोनं भक्तांकडून दान केलं जातं. एका आकडेवारीनुसार, भारतातील मंदिरांमध्ये तब्बल अडीच हजार टनांहून अधिक सोनं आहे, केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिरात 1300 टन सोने आहे, तिरुपती मंदिरात 250 ते 300 टन सोनं आहे. कोरोनाच्या काळात हा आकडा 445 टन होता, सध्या तो 799 टनांवर पोहोचला आहे. आता कोणत्या भक्ताला आपलं दान केललं सोनं असं दुसऱ्याला वाटेललं आवडेल? याशिवाय भारतात जवळपास 37 टक्के मालमत्ता महिलांच्या नावावर आहे. या मालमत्तेचे समान वाटप हा विचारही महिलांची झोप उडवणारा ठरतो. त्यामुळे पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी सोनं आणि मंगळसूत्र याबद्दलची विधान जाता जाता केलेली नसून अगदी विचारपूर्वक केलेली दिसून येतात. या विचाराला आता काँग्रेसचे नेते कसे खोडून काढतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us