अमरावती : “मी सर्व अमरावतीकरांची माफी मागण्यासाठी आलो आहे. गतवेळी मी तुम्हाला एका विशिष्ट उमेदवाराला मत देण्यास सांगितले होते. पण ती माझी चूक होती. यावेळी तुम्ही बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांना मत देऊन माझी चूक सुधारा,” असं म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज आपली चूक मान्य केली आणि जाहीर माफीही मागितली. गतवेळी राणा यांना काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पाठिंबा दिला होता. त्यात शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांचा त्यांनी 36 हजार मतांनी पराभव केला होता. निवडून आल्यानंतर मात्र नवनीत राणा यांनी भूमिका बदलली आणि भाजपसोबत राजकारण सुरु केले. आता त्याच अमरावती मतदारसंघातून भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यातूनच पवारांनी अमरावतीकरांची माफी मागितली आहे. (Sharad Pawar has admitted five mistakes in the last five years and apologized.)
पण पवारांनी आपली चूक मान्य करण्याची आणि माफी मागण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागच्या पाच वर्षांमध्ये तर ही पाचवी वेळ ठरली आहे. पाहुया शरद पवारांनी गत पाच वर्षात कधी, कुठे आणि कशासाठी आपली चूक मान्य केली अन् माफी मागितली.
शरद पवारांनी मतदारांची माफी मागण्याची सुरुवात झाली होती 2019 मध्ये साताऱ्यातून. त्यांची 2019 मधील साताऱ्यातील पावसाची सभा आठवतेय? याच सभेचा मोठा परिणाम तेव्हा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीवर आणि राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर झाला होता. या सभेचा सर्वाधिक फटका तेव्हा छत्रपती उदयनराजे भोसलेंना बसला होता. साताऱ्याच्या जनतेने त्यांचा 87 हजारांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. या सभेच्या सहा महिने आधी याच जनतेने त्यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार केले होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भाजपमध्ये येण्याचा आग्रह केला. या आग्रहाला बळी पडत उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला अन् भाजपचे कमळ हाती घेतले.
त्यानंतर साताऱ्यात पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीवेळी शरद पवारांनी केलेलं भावनिक विधान कमालाचे चर्चेचे ठरले होते. “एखाद्या माणसाकडून चूक झाली की, त्याने ती चूक कबुल करायची असते. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्याकडून चूक झाली होती. मी उदयनराजे भोसलेंना साताऱ्यातून उमेदवारी दिली”. पवारांनी असं म्हणताच उपस्थित सगळे श्रोते गदगदले. त्यानंतर लागलेल्या निवडणुकीत शरद पवार यांचे वर्गमित्र आणि माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना धूळ चारली. महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादी दुहेरी आकडेवारीही गाठणार नाही, असे म्हंटले जात असताना पवारांचे 54 आमदार निवडून आले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी पुन्हा उभी राहिली.
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे कोरोना काळात निधन झाले होते. त्यानंतर पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यात राष्ट्रवादीने भारत भालकेंचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर गतवर्षी त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. याच पक्षप्रवेशानंतर पवारांनी आपली चूक मान्य केली होती. “एखादी व्यक्ती गेली तर फार चिंता करायची गरज नसते. भगीरथ भालके यांना आम्ही ज्या वेळेला विधानसभेला संधी दिली त्याच्यानंतर आमच्या लक्षात आले होते की, आमची ही निवड चुकीची होती. त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही”
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. त्यावेळी त्यांच्यासोबत शरद पवार यांचे अत्यंत जुने सहकारी छगन भुजबळ हे देखील सोबत होते. त्यानंतर पवारांनी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात केली. या दौऱ्याची पहिलीच सभा पवारांनी छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात घेतली. आपल्या या सभेत शरद पवारांनी छगन भुजबळांवर अजिबात वैयक्तिक टीका केली नाही. याउलट त्यांनी या मतदारसंघातून भुजबळांना निवडून देणाऱ्या मतदारांची चक्क माफी मागितली. आपली निवड चुकली आणि त्याच्या यातना तुम्हा लोकांना भोगाव्या लागल्या, असे म्हणत पवारांनी येवल्यातील मतदारांची माफी मागितली. त्यांच्या या पवित्र्याने सगळेच जण चक्रावून गेले होते.
भाजपाचे एकेकाळचे खंदे नेतृत्व आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी 2020 मध्ये भाजपला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेवर संधी देऊन सन्मानितही केले. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खडसे स्वगृही परतत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि जळगावमधील एरंडोल-पारोळा विधानसभेचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी खडसे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच खडसेंना घेऊन चूक केली, असे म्हणत आपली चूकही मान्य केली, असा दावा पाटील यांनी केला होता.