महायुतीचे सहाजण राज्यसभेवर जातील; मविआकडून शरद पवार की दुसरं कोणी?

Rajya Sabha: महायुतीला सहा जागा तर महाविकास आघाडीला एक जागा मिळू शकते. महाविकास आघाडीकडून शरद पवार हे राज्यसभेवर जातील.

  • Written By: Published:
Rajysabha Election Sharad Pawar

प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी
Maharashtra Rajya Sabha polls: राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 जागांसाठी निवडणूक जाहीर केलीय. महाराष्ट्रातील सर्वाधिक 7 जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणीही पार पडणार आहे. महायुतीला सहा जागा तर महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) एक जागा मिळू शकते. महाविकास आघाडीकडून शरद पवार (Sharad Pawar) हे राज्यसभेवर जाऊ शकतात.

पक्ष निहाय संख्याबळ

विधानसभेतील सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपकडे 131 आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडे 57 आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 40 आमदार आहेत.त्यामुळे महायुतीकडे तब्बल 228 मते आहेत. तर महाविकास आघाडीकडे शिवसेना उबाठाकडे 20, काँग्रेस 16, राष्ट्रवादी शरद पवार गट 10 आमदार कडे असे 46 मते आहे. राज्यसभेचा मतांचा कोटा 37 होत आहेत. राज्यसभेसाठी प्रत्येक जागेसाठी किमान 37 पहिल्या पसंतीच्या मते आवश्यक असतात. त्यामुळे महायुतीला सहा जागा निश्चित मिळणार असल्याचे संकेत आहेत. त्यात भाजपला चार, शिवसेनेला एक आणि राष्ट्रवादीला एक जागा मिळू शकते. तरीही भाजप, शिवसेने, राष्ट्रवादीकडे अतिरिक्त मते राहत आहेत. ते मते कोणासाठी वापरले जातात हे महत्त्वाचे आहेत. मविआला एक जागा मिळवण्यासाठी तिन्ही पक्षांची एकजूट आवश्यक असल्याने महाविकास आघाडीची कसोटी पणाला लागणार आहे .

चर्चा मात्र शरद पवारांच्या नावाची
महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी रिक्त होणाऱ्या सात जागावर कोणाची वर्णी लागेल याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र सर्वात जास्त चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याच नावाची चर्चा सर्वात जास्त राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. त्यातच आता महाविकास आघाडीकडून या एका जागेसाठी शरद पवार यांच्या उमेदवारीची चर्चा जोर धरली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांनी राज्यसभेत परत येण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, 85 वर्षीय पवारांची प्रकृती आणि यापूर्वी निवृत्तीचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते उमेदवारी स्वीकारतील का, याबाबत उत्सुकता आहे.काँग्रेस आणि शिवसेना उद्धव गटातूनही या जागेसाठी दावा केला जात असून, मविआत उमेदवार निवडीसाठी चर्चा सुरू आहे. काँग्रेसने दुसऱ्या जागेसाठी (राज्यसभा किंवा विधान परिषद) दावा केला आहे.


महायुतीत उमेदवारांची रेस

भाजपकडून चार जागा अपेक्षित असून, विनोद तावडे, विनय सहस्रबुद्धे, सुनील देवधर, धैर्यशील पाटील यांसारखी नावे चर्चेत आहेत. रामदास आठवले यांना पुन्हा संधी मिळू शकते. शिवसेना शिंदे गटातून राहुल शेवाळे, तर राष्ट्रवादी अजित गटाकडून पार्थ पवार यांचे नाव पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलनीकरणारनंतर मंत्री छगन भुजबळ यांना राज्यसभेसाठी संधी दिली जाणार होती असा दावा काही माध्यमांपुढे केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो का? हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


आजोबा नातू एकाच वेळी सभागृहात?

जवळजवळ महाविकास आघाडीकडून शरद पवारांना राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे. महायुतीकडून पार्थ पवार यांना संधी दिली जाऊ शकते.शरद पवार आणि पार्थ पवार दोघेही निवडून आले, तर पवार कुटुंबातील ‘आजोबा-नातू’ एकाच वेळी राज्यसभेत दाखल होण्याची दुर्मिळ योग येऊ शकतो.


बिनविरोध निवडणूक

महायुतीने अतिरिक्त उमेदवार न दिल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते. मात्र, अंतिम निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नसल्यमुळे येत्या काळात महायुती याबाबत काय निर्णय घेती हे पाहावं लागणार आहे .

निवडणूक कार्यक्रम

-26 फेब्रुवारी : अधिसूचना जारी
– उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 5 मार्च आहे
– 6 मार्च : अर्जांची छाननी
– 9 मार्च : अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
– 16 मार्च (सकाळी 9 ते सायं. 4) : मतदान
– 16 मार्च (सायं. 5 पासून) : मतमोजणी
– 20 मार्च : निवडणूक प्रक्रिया पूर्ण

ही निवडणूक केवळ जागा भरण्यासाठी नसून महाविकास आघाडीच्या एकतेची आणि महायुतीच्या वर्चस्वाची खरी कसोटी ठरणार आहे. देशातील सर्वात जेष्ठ राजकारनी शरद पवार आपल्या उमेदवारी विषयी काय निर्णय घेतात याकडे सर्व देशाचे लक्ष लागलं आहे.

follow us