सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडल्यानंतर नाराज असलेले काँग्रेसचे (Congress) इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी विविध पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे. पाटील यांचे मोठे बंधू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील (Pratik Patil) यांनी आज (10 एप्रिल) अकोलामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. अकोल्यामध्ये आज सकाळी या दोघांमध्ये बैठक पार पडली. त्यामुळे विशाल पाटील वंचितकडून मैदानात उतरणार का? असा सवाल आता विचारला जात आहे. (Vishal Patil’s elder brother and former Union Minister Prateek Patil met Vanchit Bahujan Aghadi chief Prakash Ambedkar.)
महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी आणि मुंबईतील काही जागा वाटपावरून अंतर्गत मतभेद झाले होते. यात सांगलीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये प्रचंड ताणाताणी झाली. ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची परस्पर घोषणा केली. त्यामुळे आमदार विश्वजित कदम, इच्छुक उमेदवार विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी थेट दिल्ली गाठून सांगलीची उद्धव ठाकरे यांची मे रोजी सभा जागा सोडू नये, अशी मागणी केंद्रीय नेत्यांकडे केली होती. विश्वजित कदम यांनी मुंबईमध्ये प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची आणि नागपूरमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांचीही भेट घेतली होती.
मात्र हा चेंडू सोनिया गांधी यांच्या कोर्टात असल्याचे सांगण्यात येत होते. ठाकरेंकडून सुरुवातीपासूनच याबाबत प्रदेश नेत्यांशी कोणतीही चर्चा न करता राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा केली जात होती. अशात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट मागितली होती. पण सांगलीच्या विषयावर प्रदेश नेत्यांशी कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही राष्ट्रीय नेत्यांशी याबाबत चर्चा केली आहे, असा निरोप ठाकरेंनी दिला आणि भेट नाकारली. त्यानंतर काल (9 एप्रिल) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर पार पडलेल्या एकत्रित पत्रकार परिषदेतही सांगलीची जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षच लढणार असल्याचे तिन्ही पक्षांनी घोषित केले. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून तयारी करत असलेले विशाल पाटील नाराज झाले आहेत. याच नाराजीतून त्यांनी विविध पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे.
प्रतिक पाटील यांनी आज अकोलामध्ये प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यामुळे विशाल पाटील वंचितकडून मैदानात उतरणार का? असा सवाल आता विचारला जात आहे. मात्र विशाल पाटील यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढण्यासाठी तयारी करत असून याच पाठिंब्यासाठी ही भेट होती. या भेटीवर बोलताना आंबेडकर म्हणाले. पाटील मला भेटून गेले आहेत. पुढील निर्णय लवकरच घेऊ. सध्या कुठलाही आग्रह केलेला नाही किंवा कुठलेही सजेशन दिलेले नाही.