Download App

नागरिकांनो काळजी घ्या, राज्यात JN.1 व्हेरियंटचे 10 रुग्ण, पुण्यात दोन रुग्णांची नोंद

  • Written By: Last Updated:

Corona virus : कोरोना व्हायरसने (Corona virus) पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवली आहे. JN.1 या नवीन व्हेरियंटमुळं गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. केरळमध्ये देशातील पहिला रुग्ण आढळल्यानंतर JN.1 या व्हेरियंटने राज्यातही शिरकाव केला. राज्यात नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण सिंधुदुर्गात आढळला होता. तर आज JN.1 च्या नऊ रुग्णांची नोंद झाल्यानं आता राज्यातील एकूण रुग्णांची संख्या  दहावर पोहोचली आहे.

तुम्हीच मुलं आणा! महिलेच्या प्रश्नावर दादांचं मिश्कील उत्तर अन् एकच हशा; नेमकं काय म्हटले? 

रविवारी ठाणे महापालिका क्षेत्रात 5, पुणे महापालिका क्षेत्रात 2, पुणे ग्रामीण भागात 1 आणि अकोला महापालिका क्षेत्रात 1 रुग्ण आढळून आला. यापैकी 8 पुरुष आणि 1 महिला आहे. या रुग्णांपैकी एक 9 वर्षांचा मुलगा आहे आणि 21 वर्षांच्या महिलेलाही संसर्ग झाला आहे. एक 28 वर्षांचा तरुण आणि उर्वरित सहा जण 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक आहेत. त्यापैकी आठ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. हे सर्वजण घरीच आयसोलेशनमध्ये असल्याचे सांगण्यात आले. या सर्वांना सौम्य लक्षणं आहेत. दरम्यान, नवीन व्हेरियंटची वाढती संख्या पाहता नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Brijbhushan Sharan Singh यांनी साक्षीचे आरोप फेटाळले; संजय सिंह निकटवर्तीय नसल्याचा दावा

वाढती रुग्ण संख्या पाहता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जनतेला आवाहन केले. ते म्हणाले, नव्या व्हेरियंटचा वाढता प्रादुर्भाव पाहता गर्दीच्या ठिकाणी जाताना काळजी घ्या. शक्यतो असे कार्यक्रम टाळा. आणि गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर काळजी घ्या.  राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये याबाबत मॉक ड्रिल घेतलं जातं आहे, असं सावंत म्हणाले.

देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी
गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 चे 656 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या देशात 3,742 सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण केरळमधील आहेत. केरळमध्ये गेल्या 24 तासात 128 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. एकट्या केरळमध्ये 3000 सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आहेत. कर्नाटकात 271 सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत कर्नाटकात 96 नवे रुग्ण आढळले आहेत.

या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 35 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासोबतच सध्या राज्यात 103 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

धनंजय मुंडे यांना कोरोना

दरम्यान, महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. फेसबुक पोस्टमध्ये धनंजय मुंडे म्हणाले की, नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर मला अस्वस्थ वाटू लागले आणि माझी कोविड-19 चाचणी केली असता मी पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. फारसा त्रास होत नाही, पण मी गेल्या चार दिवसांपासून क्वारंटाईनमध्ये आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेत आहे.

Tags

follow us