Pune’s Mhalunge Pothole Accident: पुण्याच्या बालेवाडी-म्हाळुंगे भागात रस्त्यांच्या दुरवस्थेने एका निष्पाप चिमुकल्याचा बळी घेतला आहे. म्हाळुंगे येथील ग्रीन कोर्ट सोसायटीच्या विरुद्ध बाजूला असलेल्या दुर्गा कॅफे जवळ सोमवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. यात एका अकरा वर्षांच्या शाळकरी मुलाला आपल्या वडिलांच्या डोळ्यासमोर जीव गमवावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा चिमुकला आपले वडील आणि बहिणीसह दुचाकीवरून शिकवणीला निघाला होता. मात्र, रस्त्यावरील एका जीवघेण्या खड्ड्यावरून जाताना त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि गाडी स्लिप झाली. यात हा मुलगा थेट रस्त्यावर फेकला गेला. दुर्दैवाने, त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव आयशर ट्रकचे चाक या मुलाच्या अंगावरून गेले, ज्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
फडणवीसांना मंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेपाचा अधिकार; मंत्र्यांच्या निर्णयांवर परिणाम होणार?
या भयंकर अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची आणि स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. या निष्पाप जिवाच्या मृत्यूने म्हाळुंगे आणि परिसरातील रस्त्यांच्या बिकट अवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रोज नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नबीन यांच्या टीममध्ये वर्णी लागताच भाजपकडून तावडेंना आणखी एक मोठी जबाबदारी
परिसरातील सर्व खराब रस्त्यांची आणि खड्ड्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी. अपघातप्रवण आणि धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात. वाहनचालकांना पूर्वकल्पना देण्यासाठी योग्य ते सूचना फलक लावावेत. या मागण्यांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. मात्र खड्ड्यांमुळे अपघातात जीव जाण्याचे काही थांबत नाही. प्रत्येक वेळी अपघात झाल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय. पण ढिम्म प्रशासन काही केल्या ऐकायला तयार नसल्याने संतापाची लाट उसळलली आहे. एका खड्ड्यामुळे अकरा वर्षांच्या मुलाचा नाहक बळी गेल्याने स्थानिक प्रशासनाच्या आणि संबंधित विभागाच्या बेजबाबदार कारभारावर आता चौफेर टीका होत आहे.
