अजित पवार गटातील तब्बल 22आमदार शरद पवारांच्या संपर्कात? राष्ट्रवादीत पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा

अजित पवार गटातील तब्बल 22ते 23 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू.

Untitled Design 57

Untitled Design 57

22 MLAs in contact with Sharad Pawar? : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना आता नवं वळण मिळालं आहे. अजित पवार गटातील तब्बल 22 ते 23 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पक्षातील महत्वाच्या नेत्यांमध्ये बैठक झाल्याची माहिती देखील समोर आली होती. मात्र या चर्चांना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पूर्णविराम देत दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाचा विषय आता संपल्याचं स्पष्ट केलं आहे.

तरी देखील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटातील अनेक आमदार सध्या आपल्या राजकीय भविष्याबाबत साशंक आहेत. भाजपसोबतची युती, आगामी निवडणुकांची रणनीती आणि स्थानिक पातळीवरील बदलती समीकरणे यामुळे काहीआमदारांमध्ये नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. विशेषतः भाजपसोबत जाण्यास इच्छुक नसलेले काही आमदार पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर या आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

हिंदू-मुस्लिम राजकारणानेच निवडणुका जिंकत नाहीत…, भाजपच्या विजयावर प्रदीप गुप्ता यांचे विश्लेषण

मात्र या भेटींमध्ये नेमकी काय चर्चा झाली, कोणते आमदार सहभागी होते किंवा पुढील राजकीय दिशा काय असणार याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. अजित पवार गटाकडून देखील या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, आज शरद पवार गटाची महत्वाची बैठक पार पडली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आल्याचं सांगितलं. पक्ष पूर्ण ताकदीने उभा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वातच आगामी राजकारण लढणार आहोत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून 15 ऑगस्टनंतर राज्यभर दौरे केले जातील,” अशी माहिती त्यांनी दिली. 22 आमदारांच्या चर्चेबाबत विचारण्यात आल्यानंतर शिंदे म्हणाले, “आमच्याकडे अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. मात्र, जर असा प्रस्ताव आला आणि संबंधित आमदारांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं असेल, तर त्याबाबत नक्की विचार केला जाईल.”

या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा चर्चेत आली असून, पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version