Vikram Kakade Net Worth : पुणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहे. सध्या पक्षात विक्रम काकडे यांच्यामुळे सुरु असणाऱ्या नाराजीनाट्यामुळे विक्रम काकडे राज्यातील राजकारणात चर्चेत आहे.
तर आता विधान परिषदेस अर्ज दाखल करताना त्यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार विक्रम काकडे यांच्याकडे 150 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांना 10 कोटी रुपयांचे कर्ज देखील दिले आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार विक्रम काकडे (Vikram Kakade Net Worth) यांनी जय पवार (Jay Pawar) यांच्यासह परवेज ग्रँट यांना 2 कोटी 17 लाख रुपये तर इतर व्यक्ती आणि कंपन्यांना मिळून 40 कोटी 95 लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. तर दुसरीकडे त्यांच्याकडे 78 कोटी 95 लाख 65 हजार 531 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे साडेसात लाख रुपयांची रोख रक्कम असून त्यांनी विविध बँकांमध्ये 29 लाख 53 हजार रुपयांची ठेवी म्हणून गुंतवणूक केली आहे.
तसेच त्यांच्याकडे 410 ग्रॅम सोने, 5 किलोपेक्षा जास्त चांदी, अलिशान घड्याळे, महागड्या गाड्या आणि बोटी असल्याची देखील माहिती त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. तसेच त्यांनी बांधकाम क्षेत्रात 15 कोटींची गुंतवणूक केली आहे. याचबरोबर त्यांच्याकडे 50 लाख रुपये किमतीची परवानाधारक हत्यारेही आहेत.
तर दुसरीकडे प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 74 कोटी 7 लाख रुपयांची आणि त्यांची पत्नी देविक यांच्या नावावर 9 कोटी 19 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याच बरोबर दुबईत त्यांच्याकडे एक आलिशान घर देखील आहे.
पुढील काही तासांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन, महाराष्ट्रात पावसाचा इशारा, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
तर त्यांच्यावर 41 कोटी 80 लाख रुपयांचे कर्ज देखील आहे आणि 8 कोटी 39 लाख रुपयांचा प्राप्तिकर त्यांच्यावर थकीत असल्याची माहिती देखील त्यांनी या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
राज्यातील 17 जागांवर होणाऱ्या या निवडणूकीसाठी महायुतीमध्ये भाजप 11, शिवसेना शिंदे गट 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवत आहे.
