हर्षवर्धन सपकाळांचा निवडणूक आयोगाला इशारा; आषाढी वारीच्या काळातील SIR मोहिमेवर काँग्रेसचा आक्षेप

हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र लिहून ही मोहीम महिनाभर पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 103

Harshvardhan Sapkal’s objection to SIR campaign : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र लिहून ही मोहीम महिनाभर पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आषाढी वारी आणि संभाव्य अतिवृष्टीचा विचार करता लाखो मतदार गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांच्या नावांवर गंडांतर येऊ शकते, असा दावा सपकाळ यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाने 14 मे 2026 रोजी मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला होता. आयोगाच्या माहितीनुसार राज्यात सध्या मॅपिंगचे काम सुमारे 72 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून पहिला टप्पा 19 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या प्रक्रियेत बीएलओ घरोघरी जाऊन गणना प्रपत्र वाटप करणार असून मतदारांकडून ते भरून घेतले जाणार आहेत.

कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत असलेले डी.के. शिवकुमार महाराष्ट्र काँग्रेससाठी तारणहार कसे ठरले?

मात्र याच काळात राज्यातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा मानली जाणारी पंढरपूर वारी पार पडणार आहे. संत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्यांसह राज्यातील विविध भागांतून लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 20 हून अधिक जिल्ह्यांतील वारकरी अनेक दिवस घराबाहेर असतात. त्यामुळे बीएलओ घरी गेले असता संबंधित मतदार अनुपस्थित राहण्याची शक्यता असून त्यांच्या नावांबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीती काँग्रेसने व्यक्त केली आहे.

यासोबतच हवामान खात्याने जुलै महिन्यात कोकण, मुंबई महानगर परिसर, पुणे आणि सातारा भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेता मतदार यादी पुनरिक्षणाची प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडणे कठीण जाईल, असेही सपकाळ यांनी पत्रात नमूद केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आषाढी वारी आणि पावसाळ्याचा कालावधी संपल्यानंतरच एसआयआर मोहिमेचा दुसरा टप्पा राबवावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

follow us