शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसणार; 10 ते 12 नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात

ठाकरेंच्या सेनेकडून आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही, आम्ही सर्वजण निष्ठावंत आहोत, असा दावा त्यांनी करण्यात येत आहे.

News Photo   2026 07 12T141817.934

शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यांवर (Thackeray)  धक्के बसण्याचं काही कमी होताना दिसत नाही. आमदारांच्या मोठा फुटीनंतर खासदारांची मोठी फूट झाली. आत ही फूट नगरसेवकांपर्यंत आली आहे अशी चर्चा आहे.नाशिक महानगरपालिकेतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 10 ते 12 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या जोरदार चर्चा आता सुरू झाल्या आहेत. दरम्यान, दोन्ही शिवसेनेचे नेते एकाच लग्न सोहळ्यात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे, महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यासह ठाकरे यांच्या शिवसेनेचे संपर्कनेते रवींद्र मिर्लेकर आणि माजी आमदार वसंत गीते हे एकाच फ्रेममध्ये एकत्र पाहायला मिळाले. एका बाजूला पक्षफुटीच्या चर्चा गरम असताना दुसऱ्या बाजूला या नेत्यांची एकत्र उपस्थिती निव्वळ योगायोग आहे की यामागे काही राजकीय सस्पेन्स दडला आहे, याबाबत आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

Operation Tiger 3: ऑपरेशन टायगर 3, ठाकरेंना पुन्हा धक्का; 10 आमदार सोडणार साथ?

दरम्यान, महापालिकेतील शिवसेना ‘उबाठा’ गटातील नगरसेवक फुटू नयेत आणि कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी नाशिकमध्ये धाव घेत आधीच ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू केलं आहे. रामरक्षा आंदोलनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये दाखल होत त्यांनी शनिवारी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली. या वेळी पक्षासोबत ठामपणे उभे राहिल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यांनी नगरसेवकांचे अभिनंदन केले. नगरसेवकांनी देखील कितीही आमिषे दाखवली, तरी आपण पक्षासोबत एकनिष्ठ राहणार असल्याचा शब्द मिर्लेकरांना दिला.

या संपूर्ण प्रकरणाला तेव्हा गंभीर वळण मिळाले, जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते केशव पोरजे यांनी पत्रकार परिषदेत एक खळबळजनक आरोप केला. पोरजे यांच्या दाव्यानुसार, काही मध्यस्थांमार्फत नगरसेवकांना पक्षांतरासाठी मोठी आमिषे दाखविली जात आहेत. 10 नगरसेवक आणल्यास उपमहापौरपद आणि विकासकामांसाठी 5 कोटी रुपयांचा प्रभाग निधी देण्याचे आश्वासन दिले जात आहे. यामध्ये एका वकिलाचा समावेश असून, ज्याला स्वतःला स्वीकृत नगरसेवक व्हायचे आहे, तोच 5 ते 6 नगरसेवकांच्या संपर्कात असल्याचा दावा पोरजे यांनी केला.

नगरसेवकफुटीच्या बातम्या केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट करत गटनेते केशव पोरजे यांनी 15 पैकी 13 नगरसेवकांची माध्यमांसमोर परेड घडवून आणत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही, आम्ही सर्वजण निष्ठावंत आहोत, असा दावा त्यांनी केला. तसंच, ज्याप्रमाणे खासदार फुटले तेव्हा ‘ऑपरेशन तुडवा’ राबवण्यात आले, तसेच आता नगरसेवकांच्या बाबतीत ‘ऑपरेशन तुडवा’ राबविणार, असा थेट इशारा गटनेत्यांनी विरोधकांना दिला आहे.

या शक्तिप्रदर्शनादरम्यान 15 पैकी 13 नगरसेवक प्रत्यक्ष हजर होते, तर नगरसेविका मंगला आढाव आणि मुरलीधर भामरे हे दोघे कौटुंबिक दुःखद कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, भामरे यांच्या मुलाने या बैठकीला हजेरी लावून पक्षप्रमुखांसोबत असलेली आपली निष्ठा जाहीर केली. आता आगामी काळात नाशिकच्या राजकारणात नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

follow us