महायुतीनेच आश्वासन दिलं होतं, मग सावरकरांना भारतरत्न का नाही?”; विधानसभेत सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

अधिवेशनात मुनगंटीवार यांनी सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा अशासकीय ठराव मांडला होता.

  • Written By: Published:
Untitled Design 28

Sudhir Mungantiwar delivers a stinging rebuke to his own government : राज्याच्या विधानसभेत आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याच्या उद्द्यावरून मोठी चर्चा रंगली. भाजपचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच घरचा आहेर देत, महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुनगंटीवार यांनी सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा अशासकीय ठराव मांडला होता. त्यावेळी सरकारच्या वतीने यासंदर्भात सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर हा ठराव पुढे आला नाही. आज पुन्हा हा मुद्दा उपस्थित करत मुनगंटीवार यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

सभागृहात बोलताना मुनगंटीवार म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव करण्याची मागणी मी केली होती. त्यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारकडे शिफारस करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, आजच्या कामकाज पत्रिकेत त्याचा कोणताही उल्लेख नाही. सावरकरांना इंग्रजांनी आयुष्यभर यातना दिल्या, आता आपण त्यांचा अवमान करू नये.

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? केंद्राकडील डेटा अडकल्याने महायुती सरकारची अंमलबजावणी रखडली

यावेळी त्यांनी 2019 च्या महायुतीच्या जाहीरनाम्याचा देखील उल्लेख केला. महायुतीनेच आपल्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले होते. सत्ता आल्यावर आपल्या विचारांचा आणि आश्वासनांचा विसर पडता कामा नये. ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी सावरकरांच्या विचारावर जगलो, त्याच सरकारकडून ही फाईल दाबून ठेवली जात असेल, तर ते योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली. इतकेच नव्हे तर, मी आज या सभागृहात प्रतिज्ञा करतो की, यानंतर हा विषय पुन्हा मांडणार नाही. मात्र, या फाईलला इतक्या यातना का दिल्या जात आहेत, याचे उत्तर सरकारने द्यावे, असे देखील यावेळी मुनगंटीवार म्हणाले.

अहिल्यानगरमध्ये मोठी घडामोड! कर्जतमध्ये राम शिंदे-रोहित पवार एकत्र; भाजपच्या छाया शेलार बिनविरोध नगराध्यक्ष

दरम्यान, मुनगंटीवार यांच्या भूमिकेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील या विषयावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासंदर्भात ठराव आणण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, कोणताही ठराव सभागृहात आणण्यापूर्वी सर्व गटनेत्यांच्या बैठकीत त्याबाबत पूर्वसूचना आणि चर्चा होणे आवश्यक असते. यावर उत्तर देताना नार्वेकर म्हणाले हा विषय गटनेत्यांच्या बैठकीत अनवधानाने चर्चेलाच आला नाही. त्यामुळे चर्चा न करता ठराव सभागृहात आणणे योग्य ठरणार नव्हते. म्हणून तो ठराव मांडण्यात आला नाही. मात्र पुढील अधिवेशनात हा विषय चर्चेसाठी आणला जाईल आणि त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा विधानसभेत गाजला असून, मुनगंटीवार यांच्या सरकारवरील नाराजीमुळे या विषयाला आता राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे. पुढील अधिवेशनात या ठरावावर काय निर्णय होतो, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

follow us