BSNLने लाँच केला Iphone पेक्षाही महागडा फोन; खरेदीपूर्वी घ्यावी लागणार DoT ची परमिशन
BSNL New Satellite Phone जुन्या फीचर फोनसारख्या दिसणाऱ्या BSNL डिव्हाइससाठी कोणी जास्त पैसे का देईल?
BSNL Launch New Phone Expensive Than iPhone what’s Special : बीएसएनएलने भारतात 1,34,166 रुपये किमतीचा एक फोन लॉन्च केला आहे, ज्यामुळे तो ॲपलच्या आयफोन 17 प्रो पेक्षाही महाग झाला आहे. आता पहिल्यांदा पाहता, ही किंमत आश्चर्यकारक वाटू शकते. कारण, आयफोनवर फोटो काढता येतात, ॲप्स चालवता येतात, गेम्स खेळता येतात आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी मर्यादित सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीसुद्धा मिळते. मग जुन्या फीचर फोनसारख्या दिसणाऱ्या BSNL डिव्हाइससाठी कोणी जास्त पैसे का देईल? नेमका बीएसएनएल लाँच केलेला फोन कोणता तो, कसा काम करतो आणि तो कोण वापरू शकतो तसेच तो ॲपलच्या सॅटेलाइट फीचरपेक्षा कसा वेगळा आहे त्याबद्दल जाणून घेऊया…
BSNL चा फोन नेमका कोणता?
तर, बीएसएनएलचा सॅटेलाइट फोन हा दुर्गम, ऑफ-ग्रिड आणि आपत्कालीन परिस्थितीत अखंड संपर्कासाठी तयार करण्यात आलेला विशेष कम्युनिकेशन डिव्हाइस आहे. ज्या ठिकाणी मोबाईल टॉवर्सच नाहीत, अशा भागातही हा फोन कार्यरत राहतो. नवीन हँडसेट बीएसएनएलच्या ग्लोबल सॅटेलाइट फोन सर्व्हिसचा (GSPS) एक भाग आहे. जवळपासच्या मोबाईल टॉवर्सवर अवलंबून राहण्याऐवजी, तो थेट उपग्रहांशी जोडला जातो, ज्यामुळे यूजरला पारंपरिक सेल्युलर कव्हरेज नसलेल्या भागातही व्हॉईस कॉल करणे आणि एसएमएस पाठवणे शक्य होते.
बीएसएनएलच्या मते, हा फोन संरक्षण दलातील जवान, सागरी मोहिमा, आपत्कालीन प्रतिसाद पथके, खाण कंपन्या, दुर्गम औद्योगिक स्थळे, यात्रेकरू आणि साहसी प्रवाशांसाठी तयार करण्यात आला आहे. तसेच, ज्या आपत्कालीन परिस्थितीत जमिनीवरील दूरसंचार पायाभूत सुविधा खराब झाल्या असतील किंवा उपलब्ध नसतील, अशा प्रसंगांसाठीही हा फोन उपयुक्त आहे. या हँडसेटमध्ये मजबूत डिझाइन, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, व्हॉइस कॉलिंग आणि एसओएस आपत्कालीन कार्यप्रणाली आहे, ज्यामुळे तो खडतर वातावरणात वापरण्यासाठी योग्य ठरतो.
किंमत इतकी जास्त का आहे?
या फोनच्या जास्त किमतीमागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यामागील सॅटेलाइट कम्युनिकेशन तंत्रज्ञान. सामान्य स्मार्टफोन मोबाईल टॉवरशी जोडले जातात. मात्र बीएसएनएलचा सॅटेलाइट फोन इनमारसॅटसारख्या जागतिक उपग्रह नेटवर्कशी थेट संपर्क साधतो. यासाठी विशेष हार्डवेअर, उच्च क्षमतेचे अँटेना आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन मॉड्यूलची आवश्यकता असते. हे सर्व घटक सामान्य स्मार्टफोनमधील हार्डवेअरपेक्षा खूपच महाग असतात. याशिवाय सॅटेलाइट फोनचे उत्पादनही मर्यादित प्रमाणात केले जाते. त्यामुळे त्याचा उत्पादन खर्च अधिक वाढतो. फक्त हँडसेट विकत घेऊन काम भागत नाही. वापरकर्त्यांना स्वतंत्र सॅटेलाइट कम्युनिकेशन प्लॅन घ्यावा लागतो, जो सामान्य मोबाईल प्लॅनपेक्षा लक्षणीय महाग असतो.
BSNL सॅटेलाइट कॉलिंग प्लॅन्स
या आठवड्यात जरी या हँडसेटने लक्ष वेधून घेतले असले तरी, बीएसएनएलची सॅटेलाइट कम्युनिकेशन सेवा पूर्णपणे नवीन नाही. संचार मंत्रालयाच्या एका निवेदनानुसार, बीएसएनएल जानेवारी 2018 पासून सर्वसामान्य जनता आणि उद्योगांना आपली ग्लोबल सॅटेलाइट फोन सर्व्हिस (GSPS) देत आहे. ही सेवा दूरसंचार विभागाच्या (DoT) मार्गदर्शक तत्त्वांनुसार एन्क्रिप्टेड व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा पुरवते.
When conventional mobile networks can’t reach, the BSNL Satellite Phone keeps you connected.
Designed for challenging environments, making it an ideal solution for Defence, Maritime, Disaster Response, Mining, Remote Operations and Adventure Travel.
Why Choose BSNL Satellite… pic.twitter.com/Fc6vsahxRn
— BSNL India (@BSNLCorporate) July 9, 2026
या वर्षाच्या सुरुवातीला, सरकारने या सेवेसाठी दरदेखील अधिसूचित केल्या आहेत. व्यावसायिक वापरकर्ते मासिक किंवा वार्षिक प्रीपेड आणि पोस्ट-पेड प्लॅन निवडू शकतात, ज्यामध्ये मासिक व्यावसायिक प्लॅन 5,835 रुपयांपासून सुरू होतात, तर सरकारी प्लान 3,500 रुपयांपासून सुरू होतात. या प्लॅन्समध्ये ठराविक मोफत टॉकटाइम दिला जातो. त्यानंतर अतिरिक्त कॉल आणि एसएमएससाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाते.
iPhone च्या सॅटेलाइट फीचरपेक्षा BSNL चा फोन कसा वेगळा?
निवडक देशांमध्ये ॲपलच्या iPhone मध्ये Emergency SOS via Satellite हे फीचर उपलब्ध आहे. मोबाईल नेटवर्क किंवा वाय-फाय उपलब्ध नसल्यास यूजर उपग्रहाच्या मदतीने आपत्कालीन सेवांशी संपर्क साधू शकतात किंवा आपले लोकेशन शेअर करू शकतात. मात्र बीएसएनएलचा सॅटेलाइट फोन पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने काम करतो. हा स्वतंत्र सॅटेलाइट कम्युनिकेशन डिव्हाइस असल्यामुळे तो मोबाईल टॉवरशिवाय थेट उपग्रह नेटवर्कद्वारे नियमित व्हॉईस कॉल करू शकतो आणि एसएमएस पाठवू शकतो. हा फोन केवळ आपत्कालीन वापरासाठी नसून, दुर्गम भागात सातत्याने संपर्क ठेवण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
BSNL चा सॅटेलाइट फोन कोणालाही विकत घेता येतो का?
आता BSNL ने लाँच केलेल्या महागड्या फोन आणि त्याच्या फिचरबद्दल जाणून घेतले. पण, हा फोन कोणीही विकत घेऊ शकतो का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, याचे उत्तर नाही असे आहे. कारण, भारतात सॅटेलाइट फोनच्या वापरावर कडक नियम लागू आहेत. हा फोन खरेदी करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी दूरसंचार विभागाची (DoT) पूर्वपरवानगी आवश्यक आहे. आवश्यक परवानगीशिवाय सॅटेलाइट फोन वापरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.