झोप उडवणारं संशोधन! लॉक, फ्लाइट मोड अन् इंटरनेटही बंद… तरीही तुमचा फोन ट्रॅक करणं शक्य

Smartphone Tracking फोनला स्पर्श न करता किंवा ऑपरेटिंग सिस्टममध्ये किंवा स्टोअर केलेल्या डेटामध्ये प्रवेश न करता माहिती गोळा केली जाऊ शकते.

  • Written By: Published:
Chinese Research Claim Smartphone App Tracking Without Unlock

Chinese Research Claim Smartphone App Tracking Without Unlock : तुमचा स्मार्टफोन लॉक केल्यावर, फ्लाइट मोड चालू केल्यावर किंवा इंटरनेट बंद केल्यावर तुमची गोपनीयता पूर्णपणे सुरक्षित राहते, असे तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही चुकत आहात. कारण, चीनमधून समोर आलेले नवीन संशोधन तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. ज्यामध्ये चीनी संशोधकाने फोन लॉक, फ्लाइट मोडमध्ये असतानाही ट्रॅक करता येऊ शकतो असा मोठा दावा केला आहे. नेमकं हे संशोधन काय? फोन नेमका कसा ट्रॅक करणं शक्य आहे. त्याबद्दल जाणून घेऊया…

चिनी संशोधकांचा दावा काय?

चीनच्या पीपल्स पब्लिक सिक्युरिटी युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी असा दावा केला आहे की, त्यांनी एक असे तंत्रज्ञान विकसित केले आहे जे स्मार्टफोनमधून उत्सर्जित होणाऱ्या अत्यंत क्षीण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिओ सिग्नल्सचे विश्लेषण करून, फोनवर कोणते ॲप्स चालू आहेत आणि यूजर काय करत आहे हे ओळखू शकते. संशोधकांच्या मते, या तंत्रज्ञानासाठी फोन अनलॉक करण्याची, ऑपरेटिंग सिस्टीममध्ये प्रवेश करण्याची किंवा त्यातून डेटा काढण्याची आवश्यकता नाही. हे संशोधन 22 मे रोजी ‘रेडिओ इंजिनिअरिंग’ या पीअर-रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित झाले असून, याची चाचणी केवळ एका नियंत्रित प्रयोगशाळेच्या वातावरणातच करण्यात आली आहे.

नवीन तंत्रज्ञान काय आहे आणि ते कसे काम करते?

चीनच्या पीपल्स पब्लिक सिक्युरिटी युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी डिजिटल फॉरेन्सिक्ससाठी हे तंत्र विकसित केले आहे. शोधनिबंधानुसार, हे एक नॉन-कॉन्टॅक्ट फॉरेन्सिक तंत्र आहे, म्हणजेच फोनला स्पर्श न करता किंवा त्याच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये किंवा स्टोअर केलेल्या डेटामध्ये प्रवेश न करता माहिती गोळा केली जाऊ शकते. संशोधकांच्या मते, स्मार्टफोन चालू असताना अत्यंत क्षीण, कमी-फ्रिक्वेन्सीचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल उत्सर्जित करतात. हे सिग्नल वेगवेगळ्या ॲप्स आणि यूजर्सच्या वापरानुसार बदलतात. या सिग्नलचे विश्लेषण करून, फोनवर कोणते ॲप्स वापरले जात आहेत हे निश्चित केले जाऊ शकते. संशोधनानुसार, ही पद्धत डिजिटल तपासादरम्यान अतिरिक्त तांत्रिक पुरावे गोळा करण्यास मदत करू शकते.

99 टक्क्यांहून अधिक अचूकतेचा दावा

संशोधकांनी ही प्रणाली iPhone 15 Pro, Xiaomi 15 Pro आणि Oppo Reno 13 या स्मार्टफोनवर तपासली. चाचणीदरम्यान WeChat व्हिडिओ कॉल, Baidu Maps, SMS, Browser, Camera, Cloud Storage यांसारख्या अॅप्सची ओळख 99.07 टक्के अचूकतेने करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, वापरकर्ता व्हिडिओ पॉज करत आहे, सामान्य गतीने पाहत आहे की 2x स्पीडवर चालवत आहे, हेही 95.61 टक्के अचूकतेने ओळखता आल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. ही चाचणी यूट्यूब, बिलिबिली आणि टेन्सेंट व्हिडिओ यांसारख्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली.

रेडिओ सिग्नलद्वारे ओळख कशी पटवते?

संशोधन पत्रानुसार, प्रत्येक मोबाईल ॲप फोनच्या हार्डवेअरचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करतो. काही ॲप्स प्रोसेसर आणि ग्राफिक्स चिपवर अधिक ताण देतात, तर इतर ॲप्स जीपीएस, वाय-फाय मॉड्यूल, स्टोरेज कंट्रोलर किंवा वायरलेस कम्युनिकेशन सर्किट्स सक्रिय करतात. यामुळे वीज वापराच्या पद्धती बदलतात आणि विविध प्रकारचे कमी-फ्रिक्वेन्सीचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल निर्माण होतात. उदाहरणार्थ, व्हिडिओ स्ट्रीमिंग दरम्यान, ग्राफिक्स प्रोसेसर आणि डीकोडिंग हार्डवेअर अधिक सक्रिय असतात, तर नेव्हिगेशन ॲप्स अधूनमधून जीपीएस आणि स्टोरेजचा वापर करतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वेगवेगळे सिग्नल ओळखते आणि फोनवर कोणते ॲप व कोणत्या प्रकारची क्रिया चालू आहे याचा अंदाज लावते.

सिग्नल कसे गोळा केले गेले, संपूर्ण प्रक्रिया काय?

संशोधकांनी स्मार्टफोनच्या मागील बाजूस एक विशेष इंडक्शन कॉइल ठेवली, जी एका डिजिटल मॉनिटरिंग रिसीव्हरला जोडलेली होती. या उपकरणाने 150 kHz ते 650 kHz दरम्यानचे विद्युतचुंबकीय सिग्नल रेकॉर्ड केले. त्यानंतर हे सिग्नल टाइम-फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रोग्राममध्ये रूपांतरित केले गेले आणि स्पेक्ट्रोग्राम ट्रान्सफॉर्मर डीप लर्निंग मॉडेलचा वापर करून त्यांचे विश्लेषण केले गेले. संशोधकांच्या मते, ही पद्धत तपास यंत्रणांना फोनमधील डेटा न काढता वर्तणुकीशी संबंधित संकेत गोळा करण्यास मदत करू शकते. लक्ष वेधून न घेता विशेष परिस्थितीत तपास करण्यासाठी हे एक उपयुक्त तंत्र असल्याचेही संशोधकांचे मत आहे.

संशोधनात पुढे काय होणार?

कारण हे संशोधन पूर्णपणे प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात करण्यात आले आहे. सिग्नल टिपण्यासाठी अत्यंत संवेदनशील उपकरण फोनच्या अगदी जवळ ठेवावे लागले. गर्दीचे वातावरण, अधिक अंतर किंवा प्रत्यक्ष वापराच्या परिस्थितीत ही पद्धत किती प्रभावी ठरेल, याबाबत संशोधकांनी कोणताही दावा केलेला नाही. संशोधक आता या तंत्रज्ञानाद्वारे अनोळखी स्मार्टफोनची ओळख पटवणे, प्रत्येक डिव्हाइसचा स्वतंत्र इलेक्ट्रोमॅग्नेटिक ‘फिंगरप्रिंट’ तयार करणे आणि कमी खर्चिक उपकरणांद्वारेही असे सिग्नल टिपण्यावर संशोधन करत आहेत.

follow us