शरद पवारांच्या पक्षात सर्व काही आलबेल नाही? 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 26

Prithviraj Chavan’s claim : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून घडामोडींचा प्रचंड वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. या घडामोडींनंतर ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीकडून आपल्याला ऑफर असल्याचा दावा केला आणि त्यानंतर ऑपरेशन तुतारी या नव्या राजकीय चर्चेला सुरूवात झाली. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही खासदारांच्या नाराजीबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमधील पाच ते सहा खासदार सध्या अस्वस्थ असून, परिस्थिती अशीच राहिली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेप्रमाणेच शरद पवार यांच्या पक्षात देखील मोठी राजकीय फूट पडू शकते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये देखील या दाव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पाच ते सहा खासदार अस्वस्थ असल्याचं समजत आहे. ते पुढे कोणता निर्णय घेतील हे सांगणं कठीण आहे. मात्र, त्यांच्या मागे मोदी-शाह सरकार हात धुवून लागलं आहे. देशात विरोधी पक्षाचं अस्तित्वात राहू नये. अशी त्यांची भूमिका दिसून येते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं जेझालं. तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं देखील होऊ शकतं, असा गंभीर दावा त्यांनी केला.

बारामतीत दोन पोलिसांविरुद्ध महिलेच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा; भरतीत मदतीचे आमिष दाखवून केले अत्याचार

चव्हाण यांनी आपल्या वक्तव्यात केंद्र सरकारवर देखील थेट निशाणा साधला. विरोधी पक्षांतील लोकप्रतिनिधींवर विविध मार्गांनी दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्ष कमकुवत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचं सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अलीकडच्या घडामोडींचा संदर्भ दिला आणि त्याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील हालचाली सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली.

दरम्यान, पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना महत्वाचा प्रश्न विचारला. शरद पवार यांच्या पक्षातील हे नाराज खासदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर उत्तर देताना चव्हाण यांनी कोणताही ठोस दावा करण्यास नकार दिला. ते नेमकं कुठे जाणार, याची मला माहिती नाही. ते भाजपमध्ये जातील की शिंदे यांच्या शिवसेनेत, याबाबत मी काही सांगू शकत नाही. मात्र, ते अस्वस्थ असल्याचं ऐकायला मिळत आहे. ते पक्ष सोडतील की नाही, हे देखील मी सांगू शकत नाही. मी फक्त त्यांच्या नाराजीबाबत माहितीमिळत असल्याचं सांगत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीकडून ऑफर आल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं. त्या विधानानंतर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना सत्ताधारी आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे त्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.

चलनातून बाद झाली, पण 2,000 रुपयांची नोट अजूनही वैध; RBI ने दिली महत्त्वाची माहिती

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर विरोधी आघाडीच्या भवितव्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसबाबत देखील अशाच प्रकारच्या शक्यता व्यक्त केल्या जात असल्याने राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये पुन्हा बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या या दाव्याबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच, कथित अस्वस्थ खासदारांनीही याबाबत सार्वजनिक भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत या दाव्यावर कोणत्या राजकीय प्रतिक्रिया उमटतात आणि राज्याच्या राजकारणात आणखी कोणत्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us