चलनातून बाद झाली, पण 2,000 रुपयांची नोट अजूनही वैध; RBI ने दिली महत्त्वाची माहिती

RBI On Rs. 2000 Banknotes २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर सरकारने २००० रुपयांची नवीन नोट चलनात आणली, जी थोड्याच काळात बंद करण्यात आली.

  • Written By: Published:
RBI

Rs. 2000 Banknotes Continue To Be Legal Tender Say’s RBI :  2016 च्या नोटाबंदीनंतर 100, 200, 500 आणि 2,000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. त्यानंतर मे 2023 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने 2,000 रुपयांची नोट चलनातून टप्प्याटप्प्याने मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही नोट आता दैनंदिन व्यवहारांमध्ये स्वीकारली जात नसली, तरी अनेकांच्या घरात किंवा तिजोरीत अजूनही 2,000 रुपयांच्या नोटा आहेत. अशा नोटा आता निरुपयोगी झाल्या आहेत, अशी अनेकांची समजूत आहे. मात्र, 2,000 रुपयांची नोट अजूनही ‘लीगल टेंडर’ (कायदेशीर चलन) आहे. म्हणजेच तिचे मूल्य संपलेले नसल्याचे RBI ने म्हटलं आहे.

2,000 रुपयांच्या नोटेचं काय करायचं?

RBI ने आपल्या अधिकृत ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर याबाबत माहिती शेअर केली आहे. त्यानुसार, तुमच्याकडे 2,000 रुपयांची नोट असल्यास ती बदलून घेण्याची सुविधा अजूनही उपलब्ध आहे. RBI च्या माहितीनुसार, 2,000 रुपयांची नोट अजूनही पूर्णपणे वैध (Legal Tender) आहे. देशभरातील RBI च्या 19 इश्यू ऑफिसपैकी कोणत्याही कार्यालयात जाऊन नोट बदलता येते. तुम्हाला संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष जाणे शक्य नसल्यास, इंडिया पोस्टच्या माध्यमातून नोट RBI च्या इश्यू ऑफिसला पाठवता येते. त्यानंतर संबंधित रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते असे RBI ने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

RBI ने 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे बहुतांश दुकाने, व्यापारी आणि व्यावसायिक व्यवहारांमध्ये या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. मात्र, याचा अर्थ नोटेचे मूल्य संपले आहे, असा होत नाही. ती कायदेशीर चलन असल्याने RBI कडून ती बदलून घेण्याची सुविधा अद्याप सुरू आहे. RBI ने नागरिकांना अशा महत्त्वाच्या माहितीसाठी केवळ अधिकृत अपडेट्सवर विश्वास ठेवण्याचे आणि अधिक माहितीसाठी RBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन केले आहे. म्हणूनच, तुमच्या घरात अजूनही 2,000 रुपयांची नोट असेल, तर ती निरुपयोगी समजून ठेवू नका. RBI च्या नियमानुसार ती आजही वैध असून, ठरलेल्या प्रक्रियेद्वारे तिच्या बदल्यात रक्कम मिळवता येऊ शकते.

follow us