शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रोहित पवारांचा सरकारला इशारा, थेट विधानसभा अधिवेशनावर धडकणार ट्रॅक्टर मोर्चा

शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून कोणतीही ठोस घोषणा करण्यात आली नसल्याचा आरोप करत त्यांनी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 22T201604.462

Rohit Pawar warns the government regarding farmers’ demands : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून कोणतीही ठोस घोषणा करण्यात आली नसल्याचा आरोप करत त्यांनी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 4 डिसेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान शेगाव ते नागपूर असा ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्यात येणार असून, हा मोर्चा थेट नागपुरातील विधानसभा अधिवेशनावर धडकणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

विदर्भातील पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकरी आणि शेतमजुरांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले. मात्र, सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस मदत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना आवाज देण्यासाठी 4 ते 9 डिसेंबरदरम्यान शेगाव ते नागपूर असा न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसमध्ये येण्यासाठी मोठी वेटिंग लिस्ट तयार! प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी आतली बातमी फोडली

या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, भूमिहीन शेतमजुरांना 25 हजार रुपयांची मदत मिळावी, फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाख रुपये द्यावेत, तसेच फळबागा जगवण्यासाठी हेक्टरी 60 हजार रुपयांची मदत करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे विधानसभा अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याशिवाय एक रुपयात पीकविमा योजना पुन्हा सुरू करावी, मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली थांबवावी आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.

दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यंदाच्या दुष्काळामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले असून रब्बीच्या पेरणीवरही त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. यंदा रब्बीची पेरणी केवळ 17 टक्के म्हणजेच 15 ते 16 लाख हेक्टर क्षेत्रावर झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. 1972 च्या भीषण दुष्काळातही 47 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यावरून यंदाच्या दुष्काळाची तीव्रता लक्षात येते, असे त्यांनी म्हटले. बळीराजा दुष्काळाच्या वणव्यात होरपळतोय आणि सरकार सत्तेच्या नशेत धुंद आहे, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. शेतकरी संकटात असताना सरकार केवळ मदतीच्या कोरड्या घोषणा करण्यात व्यस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला. आता रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणारा शेगाव ते नागपूर ट्रॅक्टर मोर्चा किती प्रभावी ठरणार आणि या आंदोलनानंतर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us