6 rebel MPs skipped Shinde’s stage : पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पुन्हा एकदा मोठी मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाचे सहा खासदार बंडखोर भूमिकेत असून त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची चर्चा आहे. मात्र, संभाव्य अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी हे खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आज शिवसेनेचा स्थपणा दिवस असून उद्धव ठाकते गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोन्ही गटांकडून स्वतंत्रपणे वर्धापन दिन साजरा केला जात आहे. यावेळी ठाकरे गटातील बंडखोर खासदार शिंदे गटाच्या मंचावर दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, स्वतंत्र गटाला अधिकृत मान्यता मिळण्यापूर्वी दुसऱ्या पक्षाच्या मंचावर जाणे हे पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे या खासदारांनी सावध भूमिका घेत कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांना विरोधी पक्षाच्या मंचावर उपस्थित राहिल्याच्या कारणावरून संसदेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले होते. त्याच अनुभवाचा धडा लक्षात घेऊन ठाकरे गटातील बंडखोर खासदार कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.
दरम्यान, बंडखोर गटाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, सहा खासदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. मात्र, लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून स्वतंत्र गटाच्या मान्यतेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व खासदारांची अध्यक्षांसमोर वैयक्तिक उपस्थिती नोंदवल्यानंतरच पुढील काही दिवसांत या प्रक्रियेवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
Telegram वर बंदी कायम, दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
शिंदे गटाकडून या प्रकरणात प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने उचलेले जात असल्याचे सांगितले जाते. कायदेतज्ज्ञ आणि संसदीय सल्लागारांच्या मार्गदर्शनाखालीच पुढील रणनीती आखली जात आहे. या प्रकरणात पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमधील बंडखोरीच्या प्रकरणात ज्या पद्धतीने प्रक्रिया राबवली जात आहे, त्याच धर्तीवर निर्णय घेतला जाऊ शकतो. तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांना लोकसभा अध्यक्षांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी बोलावल्याप्रमाणेच, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांना देखील आपली भूमिका मांडण्याची संधी दिली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सावंत यांनी यापूर्वीच पत्र पाठवून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची मागणी केली आहे.
लोकसभा अध्यक्षांचे कारवाया दोन्ही बाजूंचे म्हणणे सविस्तर ऐकल्यानंतरच अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे बंडखोर खासदारांचे म्हणणे अध्यक्षांपर्यंत आधीच पोहोचले असेल तरी ठाकरे गटाची बाजू ऐकून घेतल्यानंतरच पुढील कार्यवाही होणार आहे. शिंदे गटाचा दावा आहे की, स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी अर्जावर सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांसमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रण देखील करण्यात आले असून योग्य वेळी ते सार्वजनिक केले जाईल, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, या सहा बंडखोर खासदारांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना वाय प्लस श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. मुंबई उत्तर-पूर्वेचे खासदार संजय दिना पाटील, परभणीचे संजय जाधव, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणू शकणाऱ्या या घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लागले आहे.
