मुंबई : तुळापूर-वढू (Tulapur-Vadhu) येथील छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या स्मारकाच्या आराखड्यात मोठा बदल करण्यात आलाय. पूर्वीचा स्वराज्यरक्षक (Swarajyarakshak)असा उल्लेख वगळून धर्मवीर (Dharmveer)असा उल्लेख करण्यात आलाय. पूर्वी या विकास आराखड्याचे नाव स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असे होते. मात्र ते आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असं करण्यात येणारंय. स्मारकाच्या 397 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आलीय. विकास आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (14 फेब्रुवारी) मंजुरी देण्यात आली.
2022 चा अर्थसंकल्प माजी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडला होता. त्या अर्थसंकल्पाची सुरुवातच स्वराज्यरक्षक संभाजीराजे अशी होती. तुळापूर-वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाचे जतन करण्यासाठी महाविकास आघाडी सरकानं काही घोषणा केल्या होत्या.
Supreme Court : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी
मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत स्वराज्यरक्षक हा शब्द काढला आहे. त्याठिकाणी आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख करण्यात आलाय. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराजरक्षक असा उल्लेख केला होता. त्यावर आक्षेप घेत भाजपनं छत्रपती संभाजी महाराज हे धार्मिक नायक असल्याचं सांगत अजित पवारांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरु केलं होतं.
तुळापूर येथील विकासकामांवर 158 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे क्षेत्रफळ 8 एकर असून त्यात रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, गॅलरी, कार्यालय, संग्रहालय, वाहनतळ, स्वच्छतागृह, प्रवेशद्वार आदी सुविधा पुरवल्या जाणार आहे. शनिवारी आणि रविवारी 10 ते 15 हजार लोक स्मारकाला भेट देतील असा अंदाज आहे. वढू बुद्रुक विकासासाठी 110 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. मंदिर, पार्किंग, संग्रहालय, स्मारकाचे प्रवेशद्वार आदी सुविधा असणार आहेत.
दर शनिवार आणि रविवारी इथे 4 ते 5 हजार नागरिक भेट देतात. वढू बुद्रुक येथील 4 एकर क्षेत्राच्या विकासासाठी 110 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शिल्प, कवी कलश समाधी, मेघडंबरी असेल.