Mahavikas Aghadi Seat Allotment : विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा दिवस म्हणजेच 29 ऑक्टोबर शेवटची तारीख असतानाही अनेक मतदारसंघांमधील जागावाटपावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ सुरु असल्याने अनेक इच्छुकांची धाकाधुक वाढली आहे. असं असतानाच जागावाटपावरुन महाविकास आघाडीत असलेले मतभेद उघडपणे समोर आले आहेत.
खास करुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील मतभेद प्रसारमाध्यमांमध्येही चर्चेत राहिलेत. एकीकडे हे मतदभेद आणि दुसरीकडे काँग्रेसवर ठाकरेंच्या पक्षाने उमेदवार याद्या जाहीर करताना एका उमेदवार संघात एकमेकांविरोधात उमेदवार दिल्याचं स्पष्ट झालं.
एकाच मतदारसंघात दोन उमेदवार
महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असतानाच उमेदवारी यादीमध्येही या वादाचे प्रतिबिंब पाहायला मिळालं. काँग्रेसने शनिवारी सकाळी दुसरी यादी जाहीर केल्यानंतर त्याच दिवशी रात्री उशीरा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. विशेष म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवार आधीच जाहीर केला आहे तिथे काँग्रेसनेही तिसऱ्या यादीत उमेदवार जाहीर केला.
काँग्रेसने शनिवारी रात्री 16 उमेदवारांची यादी जाहीर केली. पक्षाच्या तिन्ही याद्यांमध्ये एकूण 87 उमेदवारांची नावं घोषित झाली. काँग्रेसने तिसऱ्या यादीत जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये दिग्रस मतदारसंघांतून माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, या मतदारसंघातून आधीच ठाकरेंच्या पक्षाने पवन जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली होती. असं सुमारे पाच मतदारसंघात झालं आहे जिथे महाविकास आघाडीचे ५ मतदारसंघात दोन अधिकृत AB फॉर्मचं वाटप झालं आहे.
कोणते आहेत ते मतदारसंघ?
मिरज : शिवसेना-UBT व काँग्रेस
खानापूर-आटपाडी : राष्ट्रवादी-शरद पवार व शिवसेना-UBT
दक्षिण सोलापूर: काँग्रेस व शिवसेना- UBT
दिग्रस : शिवसेना- UBT व काँग्रेस
परांडा : राष्ट्रवादी-शरद पवार व शिवसेना – UBT