मिरा-भाईंदरमधील गंभीर गुन्ह्यात फरार (MCOC) असलेल्या आणि ज्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस (RCN) जारी करण्यात आली होती, त्या अख्तर कासमअली मर्चंटला काशिमिरा पोलिसांनी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतले. १७ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरोधात यापूर्वी अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले होते.
मिरा रोड (पूर्व) येथील इंटरनॅशनल बेकिंग कंपनी परिसरात १३ ऑक्टोबर २०२३ रोजी बंदुकीचा धाक दाखवून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजसह विविध पुराव्यांच्या आधारे अख्तर मर्चंटचा सहभाग निष्पन्न झाला. त्यानंतर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करत NBW आणि RCN जारी करण्यात आले.
अख्तर मर्चंट दिल्ली विमानतळावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर काशिमिरा पोलिसांच्या पथकाने त्याला दुपारी १२.२४ वाजता इंटरसेप्ट केले. त्यानंतर त्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांच्या मागणीनंतर न्यायालयाने पाच दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला असून, २२ ऑगस्टपर्यंत आरोपीला महाराष्ट्रात आणून ठाणे येथील विशेष MCOC न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणात भारतीय दंड संहितेतील गंभीर कलमांसह शस्त्र अधिनियम आणि MCOC कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. आरोपीला महाराष्ट्रात आणल्यानंतर या गुन्ह्यामागील कटकारस्थान, इतर आरोपींचा सहभाग आणि अख्तर मर्चंटची नेमकी भूमिका याबाबत पुढील तपास केला जाणार आहे. फरार आणि वॉन्टेड आरोपींविरोधातील कारवाईचा भाग म्हणून काशिमिरा पोलिसांची ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
