Kopargaon Municipal Council general elections : कोपरगाव नगरपरिषद(Kopargaon Nagarparishad) सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या शनिवार, दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान प्रक्रिया होईल. ही प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे यांनी दिली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, सुहास जगताप आदी उपस्थित होते.
मतदानाच्या दिवशी सकाळी ठीक 6:30 वाजता सर्व मतदान केंद्रांवर ‘मॉक पोल’ (चाचणी मतदान) प्रक्रिया सुरू होईल. उमेदवारांनी नेमलेल्या मतदान प्रतिनिधींनी विहित नमुन्यातील फॉर्म व दोन रंगीत पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. मतदान प्रतिनिधी संबंधित यादीतील मतदार असणे बंधनकारक आहे. केंद्रात एका वेळी एकाच प्रतिनिधीला उपस्थित राहता येईल.
शरद मोहोळ खून प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; त्या आरोपीला सोडण्याच्या आदेशाने पुणे पोलिसांना दणका
मतदानासाठी मतदारांजवळ निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 ओळखपत्रांपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र (Original ID) सोबत असणे अनिवार्य आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात, तसेच केंद्राच्या आत मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे. उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी किंवा मतदार यांनी आपले मोबाईल सुरक्षित ठिकाणी ठेवूनच मतदान केंद्रात प्रवेश करावा.
प्रचार कालावधी संपल्याने आज रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवारांनी सर्व होर्डिंग्ज, बॅनर्स, प्रचार साहित्य स्वतःहून काढून घ्यावे. त्यानंतर आक्षेपार्ह साहित्य आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. शहरातील सर्व 69 मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी 1 पोलीस उपअधीक्षक, 2 पोलीस निरीक्षक, 9 पीएसआय, 10 मोबाईल व्हॅन्स, 129 पोलीस कॉन्स्टेबल व 74 होमगार्ड्स तैनात असतील. निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे विभागाने वेटिंग तिकीट अन् RAC’चे नियम बदलले
मतदान संपल्यानंतर 21 डिसेंबर रोजी ‘सेवानिकेतन विद्यालय’ येथे मतमोजणी होणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून जारी केलेले ओळखपत्र (Pass) असलेल्या प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाईल. प्रशासनाने मतदानाच्या दिवशीही सर्व नागरिक, उमेदवार व राजकीय पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
