मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) येत्या 17 ऑगस्टपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. याची सुरुवात बीडमधील सभेतून होणार आहे. त्यापाठोपाठ आता काँग्रेसही मैदानात उतरली आहे. येत्या 16 ऑगस्टनंतर काँग्रेस राज्यात पदयात्रा काढणार आहे. या यात्रांची जबाबदारी त्या भागातील दिग्गज नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. दोन्ही प्रमुख पक्ष आणि नेते निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागल्याने ऐन पावसाळ्यात महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापणार आहे. (After August 16, Congress will take out padayatra and bus tour in the Maharashtra)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑगस्टपासून काँग्रेस महाराष्ट्रभर पदयात्रा काढणार आहे. या पदयात्रांची जबाबदारी त्या भागातील दिग्गज नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. यात पूर्व विदर्भातून स्वतः नाना पटोले, पश्चिम विदर्भातून विजय वड्डेटीवार, मराठवाड्यातून अशोक चव्हाण, उत्तर महाराष्ट्रातून बाळासाहेब थोरात, पश्चिम महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण तर मुंबईतून वर्षा गायकवाड या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. इतर विभागातील पदयात्रा झाल्यानंतर सर्व नेते एकत्रित पदयात्रा काढणार आहेत. 31 ऑगस्टपूर्वी या सर्व पदयात्रा पूर्ण करणार आहेत.
पदयात्रांनंतर सप्टेंबरमध्ये सर्व नेते एकत्रित येत बस यात्रा काढणार आहेत. बस यात्रा कोणत्या मार्गावरुन जाईल हे 31 ऑगस्टपूर्वी जाहीर केले जाणार आहे. दरम्यान, या पदयात्रेतून राज्य आणि केंद्र सरकारची पोलखोल करण्यात येणार आहे. शेतकरी, बरोजगारी, सरकार सांगते की आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहेत पण नेमका विकास कोणाचा झाला? असे वेगवेगळे मुद्दे जनतेसमोर मांडणार आहेत. अशा कार्यक्रम आम्ही तयार केला आहे, असे नाना पटोले यांनी संगितले. यानंतर राज्यांमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याही सभा होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या बंडामुळे एकीकडे राष्ट्रवादीत अस्थिरतेचे वातावरण असतानाच दुसरीकडे शरद पवार पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. याची सुरूवात पवारांनी छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यातून केली. येथे पवारांनी मतदारांची माफी मागत माझा अंदाज चुकला सांगत माफी मागितली होती. त्यानंतर आता येत्या 17 ऑगस्टपासून पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात होणार असून, बीड येथे सभा होणार आहे. त्यानंतर ऑगस्टच्या शेवटी पवारांची पुण्यात सभा घेतली जाणार आहे