मुंबई : प्रजासत्ताक दिनी(Republic Day) लोकशाहीवर अनोखं भाषण करणारा जालन्याचा विद्यार्थी कार्तिक वजीर (Kartik Vajir) उर्फ भोऱ्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भोऱ्याचं तोंडभरुन कौतुक करण्यात आलंय. मुख्यमंत्री शिंदेंनी भोऱ्याची वाटूर येथे भेट घेतलीय.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत कार्तिक वजीर शिकत आहे. खोडकर स्वभावामुळेच शाळेतील शिक्षकांनी त्याला यंदाच्या प्रजासत्ताकदिनी भाषण करण्यास सांगितलं होतं.
त्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या चार दिवस अगोदरच कार्तिकला शिक्षकांनी भाषण लिहुन दिल्याचंही त्याच्या शिक्षकांकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर कार्तिकने मन लावून भाषण वाचून ते पाठ केलं होतं.
अखेर प्रजासत्ताकदिनी कार्तिकने झेंडावंदन झाल्यानंतर शाळेच्या व्यासपीठावर जाऊन हातात माईक घेत ‘लोकशाही’ विषयावर दमदार भाषण केलंय. कार्तिक भाषणात म्हणाला होता, की लोकशाहीमध्ये तुम्हांला सर्व काही करण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्ही कोणाशीही मैत्री करु शकता, खोड्या करु शकता…, असं अफलातून भाषण त्याने केलं होतं.
त्यानंतर त्याच्या या भाषणाचा व्हिडिओ काढत तो व्हायरल करण्यात आला होता. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला चांगला प्रतिसादही मिळाला होता. त्यानंतर अवघ्या महाराष्ट्राने कार्तिकला डोक्यावर घेतल्याचं दिसून आलंय.
आमदार राजेश टोपे यांनीदेखील हे माझ्या जिल्ह्याचं टॅलेंट असल्याचं म्हणत कार्तिकचं कौतुक केलं होतं. अखेर आता कार्तिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला असून मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या भाषणाचं कौतुक करुन त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.