राजीव गांधींची हत्या झाली तशीच अजित पवारांची झाली का? अमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ
अमोल मिटकरी यांनी अजित पवार विमान अपघाताबाबत गंभीर आणि खळबळजनक प्रश्न उपस्थित करत राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आणले आहे.
Amol Mitkari’s claim creates a stir : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या कथित विमान अपघाताबाबत गंभीर आणि खळबळजनक प्रश्न उपस्थित करत राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आणले आहे. अकोल्यातील शिवजयंती कार्यक्रमात बोलताना मिटकरी यांनी या प्रकरणात अनेक अनुत्तरित मुद्दे असल्याचा दावा केला.
मिटकरी म्हणाले की, अपघातावेळी विमानाचे पायलट असलेले कॅप्टन सुमित कपूर हे सुसाईड बॉम्बर म्हणून आले होते का, असा संशय उपस्थित होतो. त्यांनी पुढे प्रश्न केला की, जर सुमित कपूर यांच्या पत्नींकडून ते जिवंत असल्याचा दावा केला जात असेल, तर अपघातात प्रत्यक्षात मृत्यू कोणाचा झाला? या प्रकरणातील विसंगती स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
याचवेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा संदर्भ देत, जसे लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इएलम (लिट्टे) कडून आत्मघाती हल्ला झाला होता, तसाच काही प्रकार अजित पवार यांच्या बाबतीत घडला आहे का?, असा थेट सवाल उपस्थित केला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिटकरी यांनी असेही म्हटले की, अजित पवार हे महाराष्ट्राला न मिळालेले शिवविचारांचे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते. त्यांच्या मृत्यूभोवतीचे गूढ अद्याप कायम असून राज्यातील शांतता आश्चर्यकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, अपघातापूर्वी विमानाची जबाबदारी सांभाळणारे कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश हे कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते? त्यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज का जाहीर केले जात नाहीत? ‘ब्लॅक बॉक्स’चा डेटा उशिरा जाहीर झाला तरी चालेल, मात्र सीसीटीव्ही फुटेज तातडीने सार्वजनिक करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. अजित पवारांचा मृत्यू गोजूबावीच्या माळरानावरील न उलगडलेले गूढ असल्याचे म्हणत, या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची गरज मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानांनंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
