Download App

ठाकरेंच्या एकजुटीचे टायमिंग चुकले? महापालिकेवरील मोर्चावरुन शिवसेना (UBT) वर टीका

मुंबई : बुलढाण्यातील भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना महायुतीचे आक्रोश आंदोलन रद्द करण्यात आले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. मात्र मुंबईकरांना ज्यांनी गेली 25 वर्ष लुटलं त्यांना प्रश्न विचारणारं आंदोलन आजच्या दिवशी स्थगित केलं असलं तरी आम्ही त्यांना प्रश्न विचारत राहू, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. (Agitation by Shiv Sena ubt leader Aditya Thackeray on bmc against Shinde government)

तर दुसऱ्या बाजूला शिवसेना (UBT) मात्र मोर्चावर ठाम असून त्यांचा मोर्चा मात्र महापालिकेवर धडकला आहे. शिवसेना (UBT) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे. आमची एकजूट मुंबई लुटणाऱ्यांविरोधात असं म्हणतं शिवसेना (UBT) ने हा मोर्चा काढला. यावेळी पक्षाचे नेते संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई असे नेते उपस्थि होते.

Buldhana : महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही; फडणवीसांची ‘समृद्धी’ला क्लिनचीट!

दरम्यान, याच मोर्चावरुन आता आदित्य ठाकरे आणि शिवसेना (UBT) च्या नेत्यांवर टीका होत आहे. बुलढाण्यातील भीषण अपघात आणि 26 जणांच्या मृत्यूनंतरही हा मोर्चा काढण्यात येत असल्याने ही टीका होत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत ठाकरे गटाच्या मोर्चावर प्रतिक्रिया दिली आहे. देशपांडे म्हणाले, “आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली असताना आपण मोर्च्याच्या राजकारणात रमणार आहोत की आपल्यामध्ये काही संवेदना अजून जागृत आहे? आपणच विचार केला पाहिजे.” असं देशपांडे म्हणाले.

दरम्यान, इतरही नेटकऱ्यांकडून मोर्चाविषयीच्या पोस्टमध्ये कमेंट करुन ठाकरेंच्या मोर्चावर टीका केली जात आहे.

मोर्चा रद्द करताना आशिष शेलार काय म्हणाले?

बुलढाण्यातील अत्यंत वेदना देणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दु:खाचा डोंगर कोसळेल्या कुटुंबासोबत आमच्या ही सहवेदना! स्वतः मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांनी सुध्दा शोकभावना व्यक्त केल्या आहेत. तर मा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घटनास्थळी पोहचत आहेत. या संपूर्ण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज होणारे भाजप आणि महायुतीचे “आक्रोश आंदोलन” आज न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आजचा दिवस दुःखाचा आहे, आज आम्ही काही बोलणार नाही. पण मुंबईकरांना लुटणाऱ्यांकडे हिशेब मात्र यापुढे ही मागतच राहू! असं शेलार यांनी ट्विट करत म्हंटलं आहे.

भीषण अपघातात 26 जण ठार :

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार बस डिव्हायडरला धडकून डिझेल टँक फुटल्याने बसने पेट घेतला आणि 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने 8 जणांचा जीव वाचला असून ते सर्व किरकोळ जखमी आहेत. त्यांच्यावर सिंदखेडराजा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज