Ahilyanagar Rain Youth Swept On Shirapur Bridge : पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे शनिवारी सायंकाळी मोठी दुर्दैवी घटना घडली. अतुल रावसाहेब शेलार (वय 31) हा तरुण पूरग्रस्त नदीवरील पुल ओलांडत असताना अचानक वाहत्या पाण्याच्या प्रवाहात सापडून बेपत्ता झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून प्रशासन व बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान, मढी परिसरात दोन भाविकांना स्थानिकांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळालं.
पाथर्डी तालुक्यातील शिरापूर (Ahilyanagar) येथे शनिवारी सायंकाळी अतुल रावसाहेब शेलार हा तरुण नदीला आलेल्या पूरपाण्यात (Flood) वाहून गेला. या घटनेमुळे गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिसगाव–शिरापूर–घाटशिरस या रस्त्यावर (Rain Update) असलेल्या पुलावरून नदीला पाणी वाहत होते. दरम्यान, अतुल शेलार हा पुल ओलांडत असताना अचानक तोल जाऊन वाहत्या पाण्याच्या प्रवाहात (Shirapur Bridge) सापडला. काही क्षणातच पाण्यासोबत वाहून गेला. घटनेची माहिती समजताच तहसीलदार उद्धव नाईक हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू असून, तरुणाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, मागील रविवार आणि सोमवारी पाथर्डी तालुक्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. त्यानंतर अधून मधून पाऊस बरसत होता.डोंगर भागात मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी शेतजमिनी वस्तीभागाला पाण्याचा फटका बसला आहे. शनिवारीही जोरदार पावसामुळे शिरापूर नदीला पूर आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. दरम्यान, तिसगाव–मढी रस्त्यावरही एका ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने दोन भाविक दुचाकीसह अडकल्याची घटना घडली.
मात्र, स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्या दोघांना सुरक्षित बाहेर काढले आणि मोठा अनर्थ टळला. तिसगाव येथील मुख्य नदीला पूर आला असून नदीचे पाणी पुलाला लागले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाकडून नागरिकांना सतत सूचना करण्यात येत आहेत की, नदी-नाले, ओढे-पूल परिसरात पावसाच्या दिवसात जीव धोक्यात घालून प्रवास करू नये.