जरांगेंच्या मुंबई मोर्चाच्या घोषणेनंतर बारस्कर आक्रमक; ‘हे आंदोलन इमेज ब्रँडिंगसाठी’

Ajay Barskar on Manoj Jarange मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चेच्या घोषणेनंतर अजय महाराज बारस्करांनी जरांगेंच्या भुमिकेवर गंभीर आरोप केले.

Ajay Barskar on Manoj Jarange

Ajay Barskar on Manoj Jarange मनोज जरांगे यांच्या मुंबईकूचच्या घोषणेनंतर अजय महाराज बारस्कर यांनी त्यांच्या आंदोलनावर, आरक्षणाच्या मागणीवर आणि भूमिकेवर गंभीर आरोप केले.

Ajay Barskar on Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आंदोलकांचा मोर्चा मुंबईला घेऊन जाण्याची घोषणा केली आहे. 15 सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचे जरांगेंनी सांगितल्यानंतर अजय महाराज बारस्कर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पत्रकार परिषदेत जरांगेंनी केलेल्या वक्तव्यांवर प्रश्न उपस्थित करत बारस्कर यांनी त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर आणि आरक्षणाच्या मागणीवर अनेक गंभीर आरोप केले.

Video : आम्हीही तक्रार करणार! आंदोलन बंद पाडण्यासाठी ED’ची नोटिस; जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप

‘जरांगेंनी उपोषण केलं होतं का?’

मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेचा दाखला देत अजय बारस्कर यांनी त्यांच्या उपोषणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जालना जिल्हाधिकाऱ्यांनी जरांगेंची भेट घेतली होती, त्यावेळी त्यांना बोलण्यासाठीही त्रास होत होता. मात्र आता पत्रकार परिषदेत त्यांच्या आवाजात आणि बोलण्यात एवढी ताकद कुठून आली, असा सवाल बारस्कर यांनी केला.

15 सप्टेंबरला मुंबईला जाण्याची घोषणा करताना जरांगेंनी नाट्यमय पद्धतीने भूमिका मांडल्याचा आरोपही त्यांनी केला. सुरुवातीला मुंबईकूचची तारीख जाहीर न करता सस्पेन्स कायम ठेवण्यात आला, तसेच यापूर्वीच्या मोर्चांमध्येही मार्ग बदलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

‘भावनिक आवाहन करून समाजाला जोडण्याचा प्रयत्न’

दीड तासांच्या पत्रकार परिषदेत मुंबईला जाण्याचे कारण सांगण्यासाठी दीड मिनिटांचा वेळ देण्यात आला, असा दावा बारस्कर यांनी केला. ‘मी तुमच्या लेकरांसाठी मरायला तयार आहे’, अशा प्रकारची वक्तव्ये करून मराठा समाजाला भावनिक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

ईडीला फक्त अंतरवालीचीच चौकशी करायची आहे का? ईडीच्या नोटिसांवरून जरांगेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप

यापूर्वी मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत गेला आणि त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र त्यावेळी काहीही मिळाले नाही, असा दावा करत आतापर्यंत केलेल्या आंदोलनाचा हिशोबही झाला पाहिजे, अशी मागणी बारस्कर यांनी केली.

‘देश संविधान आणि न्यायालयाच्या आदेशांवर चालतो’

आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना बारस्कर यांनी म्हटले की, देश संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार चालतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार आरक्षणाचा प्रश्न सुटू शकत नाही, असा टोला त्यांनी जरांगेंना लगावला.

त्यांच्या मते, कुणबीच्या नोंदी असलेल्या मराठा व्यक्तींना कुणबी आरक्षणाचा लाभ मिळतो, ज्यांच्या कुणबीच्या नोंदी नाहीत त्यांना ईसीबीसीचं आरक्षण मिळतं. जरांगे मुख्यमंत्री झाले तरी त्यांच्या सांगण्याप्रमाणे आरक्षण देता येणार नाही, असा दावाही बारस्कर यांनी केला.

‘जरांगेंची भाषा बदलली’

मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय नेत्यांबाबतच्या भाषेतील बदलावरही बारस्कर यांनी भाष्य केले. काही काळापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत जरांगे एकेरी भाषेत बोलत होते; आता मात्र त्यांना ‘साहेब’ म्हणत असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘आता ही शेवटची लढाई, मेलो तरी मागं हटणार नाही’; जरांगेंचा सरकारला इशारा!

मराठा समाजातील अनेकांना जरांगे हे आपल्याला वाचवण्यासाठी आले आहेत, असे वाटते. मात्र गरजू मराठा समाजालाच त्यांनी आपली ढाल बनवल्याचा आरोप बारस्कर यांनी केला.

ईडीच्या नोटिसांवरूनही आरोप

जरांगेंच्या सहकाऱ्यांना ईडीच्या नोटिसा आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावरूनही बारस्कर यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केले. ईडीच्या नोटिसा आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणांमध्ये दिल्या जातात. तसेच वाळू उपसा, टेंडर आणि निवडणुकांच्या माध्यमातून पैसे गोळा केल्याचा आरोप बारस्करांनी जरांगेंवर केला. मात्र या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी कोणते पुरावे दिले, हे स्पष्ट झालेले नाही.

‘मराठा आरक्षणाची लढाई जरांगेंच्या इमेजसाठी’

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आतापर्यंत साडेतीनशे जणांचा मृत्यू झाल्याचा दावा बारस्कर यांनी केला. या मृत्यूंसाठी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना जबाबदार धरले. तसेच हे आंदोलन मराठा समाजाच्या आरक्षणापेक्षा जरांगेंची प्रतिमा तयार करण्यासाठी चालवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

जरांगे पाटलांचा मुंबईत जाण्याचा निर्धार; मागण्यांचा पाढा वाचताना अश्रू अनावर

आरक्षणाच्या प्रश्नावर माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनीही जरांगे सांगतात त्या पद्धतीने आरक्षण मिळणार नसल्याचे सांगितले होते, असा दावा बारस्कर यांनी केला.

‘प्रमाणपत्र रद्द झालेल्यांनी आणि जरांगेंनीच मुंबईला जावं’

ज्या चार जणांची प्रमाणपत्रे रद्द झाली आहेत, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईला जाऊन आंदोलन करावे, असे आव्हान बारस्कर यांनी दिले.

तसेच जरांगेंचे प्रवक्ते गंगाधर काळकुटे यांनी आपण कंत्राटदार असून सरकारकडून 300 कोटींचा ठेका घेतल्याचे ऑन रेकॉर्ड सांगितल्याचा दावा  बारस्करांनी केला, ‘मग आरक्षणाची ही लढाई नेमकी कोणासाठी आहे? म्हणजे कुणबीचा दाखला नसताना यांचा विकास झाला.’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘मातोश्रीवरून सुपारी दिल्याचा दावा’

एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलण्यासाठी जरांगेंना ‘मातोश्रीवरून सुपारी’ देण्यात आल्याचे आपल्या सूत्रांकडून समजल्याचा दावा अजय महाराज बारस्कर यांनी केला. हा आरोपही त्यांनी कोणताही ठोस पुरावा न देता केल्याचे स्पष्ट आहे.

जरांगेंना आंदोलनाचा अधिकार; त्यांना रोखता येणार नाही, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी 15 सप्टेंबरपासून मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केल्याने मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. त्याच पार्श्वभूमीवर बारस्कर यांच्या आरोपांमुळे या आंदोलनावरून राजकीय आणि सामाजिक चर्चा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

 

Exit mobile version