Video : आम्हीही तक्रार करणार! आंदोलन बंद पाडण्यासाठी ED’ची नोटिस; जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
Manoj Jarange Criticizes CM Fadnavis over ED Notice : ईडी नोटीसच्या माध्यमातून आंदोलन कमकुवत करचा सरकारचा प्रयत्न असा आरोप जरांगे यांनी केला.
Manoj Jarange Criticizes CM Fadnavis over ED Notice : मनोज जरांगे पाटील यांनी 15 सप्टेंबरपासून (Jarange) मुंबईच्या दिशेने निघण्याची घोषणा केली असून, पाच दिवसांत मुंबईत पोहोचून उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र, मराठा आंदोलन कमकुवत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना ईडीच्या नोटिसा पाठवण्यात आल्याचं सांगत, या कारवाईमागं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा संशयही जरांगे यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस थेट यात पडत नसले, तरी त्यांच्या मनात काहीतरी सुरू असल्याचा दावा जरांगे यांनी केला. अंतरवाली सराटीतील सामान्य लोकांना ईडीच्या नोटिसा पाठवून काय साध्य करायचं आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आंदोलनात काम करणाऱ्या व्यक्तींना चौकशीच्या नोटिसा देऊन त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न होत असल्याचं सांगत, अशा कारवायांमुळं ईडीची प्रतिष्ठाच धोक्यात येत असल्याची टीका त्यांनी केली.
‘आता ही शेवटची लढाई, मेलो तरी मागं हटणार नाही’; जरांगेंचा सरकारला इशारा!
‘माझ्या जवळच्या लोकांना नोटिसा पाठवून आंदोलनापासून दूर करण्याचा डाव आहे. त्यांना गार करायचं आणि आंदोलन बंद पाडायचं, असा प्रयत्न सुरू आहे,’ असा आरोप जरांगे यांनी केला. आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांना चौकशीला सामोरं जावं लागलं, तरी ते मागे हटणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच, ईडीने केवळ अंतरवालीतील लोकांचीच चौकशी न करता इतर ठिकाणच्या कथित गैरव्यवहारांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तींविरोधातही ईडीकडं अर्ज करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. कंत्राटदार, नोकरीतील व्यक्ती, इमारत बांधकाम किंवा दवाखान्यांशी संबंधित व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय, केवळ अंतरवाली सराटीतच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी झाली पाहिजे आणि गावांच्या विकासकामांच्या फाईलींचीही तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.