मनोज जरांगेंची मोठी घोषणा; आंदोलकांचा मोर्चा घेऊन मुंबईला जाणार
manoj jarange mumbai march जरांगेंनी आंदोलकांचा मोर्चा घेऊन मुंबईला जाण्याची घोषणा त्यांनी केली.
Manoj jarange on mumbai march: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली आहे. आपल्या मागण्यांसाठी आता आंदोलकांचा मोर्चा घेऊन मुंबईला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मुंबईकडे जाताना पाच ठिकाणी मुक्काम करण्यात येणार असून, 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुंबईत पोहोचण्याचे नियोजन आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकूचचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, तिसऱ्या दिवशी पुण्यातील हडपसर आणि चौथ्या दिवशी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे मुक्काम करण्यात येणार आहे. पाचव्या दिवशी हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार आहे.
‘मुंबईला येता येत नसेल तर मार्गावर येऊन आशीर्वाद द्या’
मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर मराठा बांधवांनी उपस्थित राहून आंदोलनाला आशीर्वाद द्यावा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. मुंबईत येणे शक्य नसलेल्या मराठा बांधवांनी आपण ज्या मार्गाने मुंबईकडे जाणार आहोत, त्या मार्गावर येऊन पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी म्हटले.
तसेच ज्या मराठा बांधवांकडे वाहने आहेत, त्यांनी आंदोलकांना मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या घोषणेनंतर मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट झाली असून, मुंबईकूचसाठी मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे.
बातमी अपडेट होत आहे…