Municipal Corporation Elections : अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांची राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 29 महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात महापालिका निवडणुकांची घोषणा होताच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांकडून जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. राज्यात आता बेरीज वजाबाकीचे राजकारण सुरु झाले आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.
ठाणे (Thane Municipal Corporation Elections) , पुणे, मुंबईसह राज्यातील महत्वाच्या महापालिकेत महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजप आणि शिवसेनेने घेतला आहे. या नुसार ठाणे महापालिकेसाठी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) एकत्र निवडणूक लढवणार आहे मात्र ठाणे महापालिकेत महायुती म्हणून अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणूक लढवणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहरध्यक्ष नजीब मुल्ला (Najeeb Mulla) यांनी पत्रकारांशी बोलताना ठाणे महापालिका स्वबळावर लढवणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात महायुतीमधील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कुणाला धक्का देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
माध्यमांशी बोलताना नजीब मुल्ला यांनी सांगितले की, आम्ही महायुतीमधील घटक पक्ष असले तरी आम्ही ठाणे महापालिका निवडणुकांबाबत भूमिका मांडली आहे की, आम्ही भाजप आणि शिवसेनेसोबत युती करणणार नाही. याबाबत आम्ही वरिष्ठ नेत्यांना देखील माहिती दिली आहे.
पुण्यातही युती नाही
तर दुसरीकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी देखील अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत युती करणार नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
ठाणे महापालिकेसाठी असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात – 23 डिसेंबर 2025
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत – 30 डिसेंबर 2025
उमेदवारी अर्जांची छाननी – 31 डिसेंबर 2025
उमेदवारी माघारीसाठी अंतिम मुदत – 2 जानेवारी 2026
उमेदवारांना चिन्ह वाटप – 3 जानेवारी 2026
मतदान – 15 जानेवारी 2026
मतमोजणी – 16 जानेवारी 2026
आर्थिक फायदा होणार पण भावनिक निर्णय टाळा; जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा राहणार?
