मुंबई : राज्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजुनही नुकसान भरपाई मिळालेली नाही, कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळत नाही, मातीमोल दरानं कृषी उत्पादन विकण्याची वेळ, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र सुरु आहे, लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत, माजी मुख्यमंत्र्यांवर पाळत ठेवली जात आहे. माजी मंत्र्यांच्या कुटुंबियांना अंडरवर्ल्डच्या मार्फत संपविण्याची खुलेआम भाषा सुरु आहे. इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत, राज्यातली गुंतवणुकीसह रोजगार दुसऱ्या राज्यात जात आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमान, स्वाभिमानासह हित जपण्यात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde-Devendra Fadanvis) सरकार सपशेल अपयशी ठरले असून शिंदे-फडणवीस सरकारची कामगिरी अत्यंत सुमार असल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज केला.
महाराष्ट्राचा स्वाभिमान संभाळण्यास अपयशी ठरलेल्या घटनाबाह्य सरकारने अधिवेश्न पूर्व संध्येला आयोजित चहापानाच्या कार्यक्रमाला जाणे म्हणजे महाराष्ट्र द्रोह ठरेल, अशी ठोस भूमीका घेत चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. यावेळी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, आमदार कपील पाटील, अनिल परब, जितेंद्र आव्हाड, सुनील प्रभू उपस्थित होते.
Sanjay Raut : कंगना, ही कोण शहाणी ? ती तर.. राऊतांनी कंगनाला फटकारले
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळाच्या, उद्यापासून मुंबईत, सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आज झाली. बैठकीला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगढच्या रायपूरमध्ये सुरु असल्यानं, बहुतांश प्रमुख नेते तिथं गेले आहेत. तेही संपर्कात असून त्यांनीही बैठकीतील निर्णयांना पाठिंबा दिला आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यानं, प्रामुख्यानं त्यादृष्टीनं चर्चा झाली.
गेल्या अर्थसंकल्पातील किती योजना पूर्ण झाल्या. किती अपूर्ण राहिल्या. किती सुरुच झाल्या नाहीत. त्यांचा आढावा घेऊन, त्या पूर्ण कशा होतील. स्थगितीमुळं जी कामं अडून राहिली आहेत, त्यांना पुढं कसं नेता येईल, यादृष्टीनं विचार झाला. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न मांडून, त्यांना न्याय देण्यासाठी, काय केलं पाहिजे. व्यूहरचना काय पाहिजे, यादृष्टीनं चर्चा झाली, असे अजित पवार यावेळी म्हणाले.