Download App

फडणवीस ते अजितदादा : श्याम बेनेगल यांच्या निधनाने राजकीय नेते हळहळले…

ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल (Shyam Benegal) यांचे आज (दि. 23) निधन झाले. बेनेगल गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते.

  • Written By: Last Updated:

मुंबई : ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेग (Shyam Benegal) यांचे आज (दि. 23) निधन झाले. बेनेगल गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला. भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तववादी चित्रपट निर्मितीचे समांतर पर्व आणणारे, पितामह म्हणून प्रख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल अजरामर राहतील, अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बेनेगल यांना श्रध्दांजली वाहिली.

मोठ्या मताधिक्यामुळे जबाबदारी वाढली, सर्वांच्या सहकार्याने पार पाडणार ; आमदार आशुतोष काळे 

चित्रपट माध्यमाचे सामर्थ्य ओळखून भारतीय चित्रपट सृष्टीच्या विकासात, वैभवात भर घालण्याचे बेनेगल योगदान अमूल्य असेच आहे. त्यांच्या कलाकृतींनी भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून दिली. कर्नाटक कोकणी कुटुंबातून आलेल्या दिवंगत बेनेगल यांनी छायाचित्रकार असलेल्या वडिलांनी भेट म्हणून दिलेल्या कॅमेराद्वारे वयाच्या बाराव्या वर्षीच चित्रपट निर्मितीला सुरुवात केली. अंकुर, द सिडलींग, मंथन, मंडी, जुनून यांसारख्या अनेक चित्रपटांनी भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तववादी निर्मितीचे पर्व आणले. त्यांनी माहितीपट, जाहिरात पट निर्मितीतही आपला ठसा उमटवला. यातही त्यांची लेखनशैली आणि मांडणी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. समांतर चित्रपट चळवळीला बेनेगल स्पर्श आणि विचार देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले, असं फडणवीस म्हणाले.

पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली ; मुख्यमंत्री फडणवीसांचे गौरवोद्गार 

त्यांच्या चित्रपटातून सर्वसामान्यांचे जगणे पडद्यावर आले. सहजता हे त्यांचे वैशिष्ट्य नव्हते तर कला आणि त्यांच्या जगण्याचे ते सूत्र होते. बेनेगल यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती तर केलीच त्याचबरोबर भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक नामवंत कलाकार दिले. त्यांच्या दिग्दर्शकीय नजरेतून अनेक कलाकार घडले. चित्रपटसृष्टीला आधुनिक वळण देणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकांच्या प्रभावळीत श्याम बेनेगल अग्रणी होते. त्यांच्या कलाकृतींचे, शैलीचा अभ्यास रसग्रहण आजही कुठे ना कुठे सुरू असते, हीच त्यांच्या कलाविष्काराची महत्ता आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा एक मार्गदर्शक अध्वर्यू काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने चित्रपट निर्मिती, कला क्षेत्राचे भरून न निघणारी हानी झाली आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

चित्रपटक्षेत्रातील दीपस्तंभ हरपला – अजित पवार
आपल्या प्रतिभाशाली दिग्दर्शनाने भारतीय चित्रपटसृष्टीला नवा आयाम देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाने भारतीय चित्रपटक्षेत्रातील दीपस्तंभ हरपला आहे. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे, अशा भावना पवारांनी व्यक्त केल्या.

अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनानं बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा प्रयोगशील चित्रपट दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे. सामाजिक भान राखून त्या धाटणीचे सर्वस्पर्शी चित्रपट बनवण्यात बेनेगल यांचा हातखंडा होता. ‘अंकुर’, ‘भूमिका’, ‘जुनून’, ‘निशांत’, ‘मंथन’ या चित्रपटांच्या माध्यमातून ते कायम स्मरणात राहतील. भारतीय चित्रपटविश्वाला समृद्धता, नवी उंची प्राप्त करून देण्यात बेनेगल यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांचं निधन ही भारतीय सिनेसृष्टीची मोठी हानी आहे. मी श्याम बेनेगल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बेनेगल कुटुंबियांच्या, त्यांच्या चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.

राज्यपालांकडून शोक व्यक्त…
अंकुर, निशांत आणि मंथन यांसारख्या उत्कृष्ट कलाकृतींच्या माध्यमातून श्याम बेनेगल यांनी सामाजिक वास्तवाचे चित्रण मांडण्याचे धैर्य दाखवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रतिभावंत कलाकार जगासमोर आले. ‘भारत एक खोज’ या ऐतिहासिक दूरदर्शन मालिकेच्या माध्यमातून त्यांनी लाखो प्रेक्षकांना भारताच्या गौरवशाली इतिहासाची नव्याने ओळख करून दिली. त्यांच्या निधनामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांना प्रेरणादायक असणारा एक प्रतिभावंत निर्माता – दिग्दर्शक गमावला आहे. मी दिवंगत श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना आपल्या शोक संवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

बेनेगल यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत पोकळी…
सामान्यांचा संघर्ष, त्यांचे प्रश्न चित्रपटातून मांडणारे दिग्गज दिग्दर्शक पद्मश्री श्याम बेनेगल यांच्या निधनामुळे सामाजिक बांधलकी जपत चित्रपट निर्माण करणाऱ्या चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

 

 

follow us