मुंबई : अनेक वर्षापासून सार्वजनिक आरोग्य धोरण निर्माते आणि डॉक्टर आणखी काही रुग्णालये स्थापन करण्याचा गरज व्यक्त करत आहे. शिवाय कोरोना काळात आरोग्य यंत्रणेचं महत्व सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळं महाराष्ट्रातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी नवीन रुग्णालयांना मंजूरीबरोबरच आरोग्य पदभरती करण्याचे निर्देश देण्यात आले. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळात एक बैठक झाली. याबैठकीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी हे निर्देश दिले आहेत.
गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध कामांना वित्त विभागाची मंजुरी व निधी मिळावा यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयांच्या मान्यतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्रामीण भागात नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. त्यामुळेच मोर्शी, अर्जुनी मोरगाव, सडक, अर्जुनी, वरुड, तुमसर, पुसद, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, वसमत, गंगापूर, खुलताबाद, औंढा नागनाथ, अकोले, संगमनेर, सुरगाणा, शिरूर, आंबेगाव, मंचर, बारामती, खेड, मोहोळ, अहमदनगर आदि तालुक्यातील नवीन प्राथमिक व उपआरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरी देण्याबरोबरच रुग्णालयांच्या दर्जोन्नती व भरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश अजित पवार यांनी गुरुवारी दिले.
भारताचे जवान शहीद झाले, तेव्हा BJP च्या मुख्यालयात सेलिब्रेशन; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात
रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी पद निर्मितीची प्रक्रिया सुरू करावी. ज्या ठिकाणी रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणी फर्निचर देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी दिला जाणार आहे. त्यानुसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
आरोग्य विभागातील भरतीबाबत अजित पवार म्हणाले की, आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने या विभागातील डॉक्टर, परिचारिका, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या किमान ३ महिने आधी भरती प्रक्रिया सुरू करावी.
या बैठकीला सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार यशवंत माने, मनोहर चंद्रिकापुरे, राजू कारेमोरे हे प्रत्यक्ष हजर होते. तर सतीश चव्हाण, देवेंद्र भुयार, दिलीप मोहिते, डॉ.किरण लहामटे, नितीन पवार, राजेश पाटील, चंद्रकांत नवघरे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा आणि संबंधित जिल्हा आरोग्य यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.