Ajit Pawar On Badlapur Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये (Badlapur Encounter) मृत्यू झाला आहे. यानंतर विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहे. पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्याने मुंब्रा बायपास परिसरात पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर दोन गोळ्या झाडले त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर तीन गोळ्या झाडले आणि यात त्याचा मृत्यू झाला. मात्र या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर विरोधकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तर पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहितेतील कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तसेच मयत आरोपीच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
तर दुसरीकडे आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रेमध्ये करमाळा येथे बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशीची मागणी करण्यासाठी बदलापूरच्या नागरिकांनी 09 तास रेल्वे बंद केली होती. आम्ही त्याला अटक केली. एसआयटी स्थापन केली. संपूर्ण देशात चर्चा झाली, विरोधक म्हणत होते यांच्या राज्यात महिला सुरक्षित नाही. आम्ही त्या आरोपीला पकडले आणि काल त्याला जेलमधून पुढे नेत असताना त्याने शेजारी बसणाऱ्या पोलिसावर दोन गोळ्या झाडले आणि मग पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर तीन गोळ्या झाडले. लोक म्हणत होते त्याला जन्मठेप द्या पण तो लवकर गेला. मी त्याचे समर्थन करत नाही, स्वसंरक्षणासाठी केला असं पोलीस म्हणत आहे. त्याची चौकशी होईल. पण आता विरोधक म्हणत आहे त्याला का मारले? अरे तुम्हीच म्हणत होते त्याला फाशी द्या. असं अजित पवार म्हणाले.
प्रकरण काय
बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती. आरोपीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती.
या घटनेचा तपास करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. या प्रकरणात बदलापुर पुर्व पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 65(2),74,75,76 सह पोक्सो कायदा कलम 4 (2),8, 10 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.