भिवंडीत एफडीएची मोठी कारवाई, मुदतबाह्य खाद्यपदार्थ प्रकरणी ॲमेझॉन इंडियाच्या गोदामाचा परवाना निलंबित

मुदतबाह्य आणि खराब अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते पुन्हा विक्रीसाठी बाजारात पाठवले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

Untitled Design 57

Untitled Design 57

Amazon India’s warehouse license suspended : ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. भिवंडीतील ॲमेझॉन इंडियाच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मुदतबाह्य आणि खराब अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते पुन्हा विक्रीसाठी बाजारात पाठवले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित गोदामाच्या अन्न व्यवसाय परवाना देखील निलंबित करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात सुरू असलेल्या विशेष मोहीमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. भिवंडी तालुक्यातील सावली येथील ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामात मुदतबाह्य आणि खराब अन्नपदार्थांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नसल्याची माहिती अन्न सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी मध्यरात्री अन्न सुरक्षा पथकाने या गोदामावर अचानक धाड टाकली.

तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली. ॲमेझॉनच्या गोदामातून बाहेर पडणारे मुदतबाह्य अन्नपदार्थ नष्ट कारण्यासाटःई आर. के. ट्रेडर्स या कंपनीशी करार करण्यात आला होता. मात्र, या कंपनीने अन्नपदार्थ नष्ट केल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केले. प्रत्यक्षात हेच अन्नपदार्थ पुन्हा विक्रीसाठी बाजारात पाठवले जात असल्याचे तपासात उघड झाले.

महसूल खात्यातील ‘स्टॅम्प ड्युटी स्कॅम’चा पर्दाफाश, 20 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या संशयाने खळबळ

या प्रकरणात आर. के. ट्रेडर्सचे मालक रहमान के. आणि ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे पश्चिम विभागाचे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नूर यांचा सहभाग आढळून आल्याचा दावा अन्न व औषध प्रशासनाने केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद सावंत कांडेलकर यांच्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेतील फसवणूक आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, ज्या ॲमेझॉन रिटेल इंडिया गोदामातून हा प्रकार समोर आला, त्या विशिष्ट आस्थापनेचा अन्न व्यवसायाचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ निलंबित केला आहे. ही कारवाई केवळ सावली येथील संबंधित गोदामपुरती मर्यादित असून संपूर्ण कंपनीच्या परवान्यावर त्याचा परिणाम होत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या धडक कारवाईनंतर मुदतबाह्य अन्नपदार्थांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे देखील कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

Exit mobile version