Maharashtra Assembly Session : भर सभागृहात शिवीगाळ करणं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना चांगलंच महागात पडलं आहे.विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी दानवेंना पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबित केलं आहे. विधिमंडळाच्या सभागृहात काल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती.
दानवे-लाड यांच्यात तू तू में-में! मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद, दानवेंनी धमकावलं..
लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिंदू समाजाबद्दल अवमानजनक भाष्य केल्याने भाजपच्या आमदारांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही आक्रमक पवित्रा घेण्यात आला. यामध्ये अंबादास दानवे यांनी भर सभागृहात शिवीगाळ केली असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला होता. या वादामुळे गोंधळ झाल्याने सभा तहकूब करण्यात आली. एकूणच या वादानंतर अंबादास दानवे यांनी मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद असल्याचं म्हणत दानवेंनी धमकावल्याचे प्रसाद लाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
या प्रकरणी वाद चांगलाच वाढला होता. दिवसभर याच प्रकाराची चर्चा सुरू होती. भाजप नेते तर दानवेंवर तुटून पडले होते. यानंतर दानवेंनीही स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आजही विधानपरिषदेत या वादाचे पडसाद उमटले. दानवेंवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज सकाळी प्रसाद लाड यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते. त्यानंतर सभागृहातही भाजप आमदारांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला.
अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला. यानंतर सभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबित केलं. या निर्णयावर विरोधकही चांगलेच संतापले. त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. या मुद्द्यावर सविस्तर चर्चेची मागणी केली. सभापतींनी मात्र ही मागणी फेटाळून लावली. तसेच विरोधकांना चांगलेच फटकारले.
सभागृहात अशा प्रकारचे शब्द वापरणे अत्यंत चुकीचे आहे. ही कोणती संस्कृती आहे. त्यांच्या नेत्यांनी त्यांना समजावयाला हवे अन्यथा असाच चुकीचा पायंडा पडेल असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
आमदार प्रसाद लाड यांनी काय आरोप केले?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भर सभागृहात हातात माईक घेत शिवीगाळ केली. त्यामुळे शिव्या देणाऱ्या दानवेंवर कारवाई झाली पाहिजे. त्यांना निलंबित करुन राजीनामा घ्यावा. लोकसभेत आज राहुल गांधींनी हिंदू समाज हिंसक असल्याची अभद्र भाषा केली त्याचा पंतप्रधान मोदींनी निषेध केला. ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर आम्ही हा विषय सभागृहात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला सभा तहकूब करण्यात आली.