2014 पूर्वी देश भ्रष्टाचार, जातीवाद अन् परिवारवादाने ग्रासला होता; अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा

मोदींनी शासनप्रमुख म्हणून 25 वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्याच्या निमित्ताने भाजपकडून देशभरात महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे.

Untitled Design   2026 09 13T172837.849

Untitled Design 2026 09 13T172837.849

Amit Shah targets the opposition : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून 25 वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्याच्या निमित्ताने भाजपकडून देशभरात महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. 17 सप्टेंबर ते 17  ऑक्टोबर या कालावधीत चालणाऱ्या या अभियानांतर्गत 12 प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असलत्याची माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेत त्यांच्या नेतृत्वामुळे देशाच्या राजकारणात आणि विकासाच्या वाटचालीत मोठे परिवर्तन झाल्याचा दावा केला.

नरेंद्र मोदी यांनी आधी गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून सलग 25 वर्षे शासनप्रमुख म्हणून काम केल्याचे सांगत अमित शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीचे कौतुक केले. सलग 25 वर्षे जनतेची सेवा करणे ही मोठी बाब आहे. मोदीजींच्या संपूर्ण कारकिर्दीत सेवाभाव केंद्रस्थानी राहिला आहे. त्यांनी स्वतःला ‘प्रधानसेवक’ म्हणून देशासमोर मांडले, असे शाह म्हणाले. याच पार्श्वभूमीवर भाजप देशभरात सेवा संकल्प अभियान राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

2014 पूर्वी देश भ्रष्टाचार, जातीवाद आणि परिवारवादाने ग्रासला होता, असा दावा करत अमित शाह यांनी काँग्रेससह तत्कालीन राजकीय व्यवस्थेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 2014 नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात परिवर्तनाला सुरुवात झाली आणि भ्रष्टाचार, जातीवाद तसेच परिवारवाद या तीन नकारात्मक प्रवृत्ती समूळ नष्ट झाल्या, असा दावा शाह यांनी केला. मोदी यांच्या नेतृत्वामुळे प्रशासनात पारदर्शकता आणि विकासाला प्राधान्य मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

देशाच्या आर्थिक प्रगतीचे श्रेयही शाह यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला दिले. भारताकडे आज जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून पाहिले जात असून देश विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकारच्या कार्यकाळात 25 कोटी नागरिक दारिद्र्यरेषेच्या वर आल्याचा दावाही शाह यांनी केला. भारताची आर्थिक ताकद वाढण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरील देशाची प्रतिमा आणि प्रभावही मजबूत झाल्याचे ते म्हणाले.

मोदी यांच्या कार्यकाळात जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली असून भारतीय पासपोर्टचे महत्त्वही वाढल्याचा दावा शाह यांनी केला. जागतिक व्यासपीठांवर भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून देशाचा आवाज अधिक प्रभावीपणे मांडला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यशैलीबाबत बोलताना अमित शाह यांनी गुरुनानक यांच्या विचारांचा तसेच समर्थ रामदास स्वामींच्या संकल्पनेचा उल्लेख केला. मोदींनी गुरुनानक यांच्या विचारांवर काम केले. समर्थ रामदास स्वामींच्या ‘उपभोग शून्य स्वामी’ या संकल्पनेच्या आधारे त्यांनी आपली कार्यपद्धती ठेवली, असे शाह म्हणाले. सत्तेचा वैयक्तिक उपभोग न घेता ती जनसेवेचे माध्यम म्हणून वापरण्याची भूमिका मोदी यांच्या कारकिर्दीत दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्या 25 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीचे औचित्य साधून 17 सप्टेंबरपासून भाजपचे ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू होणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या अभियानातून विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबवले जाणार असून देशभरात 12 प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली.

Exit mobile version