पुणे : शाहू-फुले-आंबेडकर-शिवाजी महाराज-सावित्रीबाई फुले हेच माझं दैवत आहेत. कोणी कितीही धर्माचे गाजर दाखवून धर्माच्या नावाखाली हरामखोरी करण्याचा प्रयत्न केला. तरी या भारताच्या संविधानाला धक्का सुद्धा लागू शकत नाही. सध्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्या महापुरुषांवर बोलले जात आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक आहे. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील भिक मागणारे नव्हते. जी लोक असं म्हणत आहेत. तेच स्वत: निवडून येण्यासाठी मतांची भिक मागत असतात, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या वतीने आयोजित ६ व्या युवा संसद सभेमध्ये ‘आयडिया ऑफ इंडिया’ या सत्रामध्ये ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य : अतिरेक ? गळचेपी?’ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी बोलत होते.
अमोल मिटकरी म्हणाले की, आज समाजातील प्रत्येक मुलगी, स्त्रीया या स्वत :च्या पायावर उभ्या आहेत. त्या केवळ महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आहे. आपल्याला शिक्षण, आचार, विचार, बोलण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ त्यांच्यामुळेच मिळाले आहे.
ट्रोल करणाऱ्या या माणसांकडून मला क्रांतीची अपेक्षा नाही. क्रांती हे काय करतील. हे तर सोशल मीडियावर हिंसक पोस्ट करतात. हिंदू-मुस्लिम करुन दंगे करण्याचे कारस्थान करतात. मात्र, आपण यांच्या आघोरी हिंसक प्रचाराला बळी पडायचे नाही. आपण समाज एकत्र ठेवण्याचे काम करायचे. या देशाची सर्वधर्म समभावाची संकल्पना कायम ठेवण्यासाठी काम करायचे, असे अमोल मिटकरी यावेळी म्हणाले.